England Playing XI For ENG vs NZ 3rd Test: न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला घरच्या मैदानावर दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यातील पराभवानंतर इंग्लंडने मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्याची तयारी सुरु केली आहे. मालिकेतील तिसरा सामना २५ जूनपासून ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या तगड्या प्लेईंग ११ ची घोषणा केली आहे. मुख्य बाब म्हणजे कर्णधार बेन स्टोक्सचं पुनरागमन झालं आहे.

न्यूझीलंडविरूद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज गस एटकिंसनला प्लेईंग ११ मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. पण निर्णायक सामन्यासाठी दोघांनाही प्लेईंग ११ मध्ये स्थान देण्यात आलं आहे. माध्यमातील वृत्तानुसार पहिल्या कसोटीत न्यूझीलंडला हरवल्यानंतर, विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी कर्णधार बेन स्टोक्स आणि गस एटकिंसन हे दोघेही एका नाईट क्लबमध्ये गेले होते. त्यावेळी दोघांचा २१ वर्षीय रग्बी खेळाडू टोटोआ औवासोबत वाद झाला होता. या वादाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या विशिष्ट करारनाम्यातील अटींचे उल्लंघन आहे. त्यामुळे दोघांनाही प्लेईंग ११ मधून बाहेर करण्यात आलं होतं.

काही वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला होता, की या घटनेनंतर इंग्लंड क्रिकेट बोर्ड बेन स्टोक्सला कर्णधारपदावरुन काढून टाकण्याच्या विचारात आहे. पण असं काहीच झालेलं नाही. न्यूझीलंडविरूद्धचा तिसरा सामना हा इंग्लंडसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण ही मालिका सध्या १-१ ने बरोबरीत आहे. स्टोक्स आणि एटकिंसनचं पुनरागमन झाल्यानंतर इंग्लंडच्या प्लेईंग ११ मध्ये बदल झाला आहे. सोनी बेकर, जेम्स रेव आणि जोश टंग यांना प्लेईंग ११ मधून बाहेर करण्यात आलं आहे.

न्यूझीलंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी अशी आहे इंग्लंडची प्लेईंग ११:

रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स (कर्णधार),गस एटकिंसन, शोएब बशिर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, जॉर्डन कॉक्स, बेन डकेट, मॅथ्यू फिशर, एमिलियो गे, ओली रॉबिन्सन, जो रूट आणि जेमी स्मिथ.