England Playing XI for 1st T20I vs India: भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेला उद्या १ जुलैपासून सुरूवात होणार आहे. दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाईल. भारताच्या नेतृत्त्वाची जबाबदारी श्रेयस अय्यरच्या खांद्यावर आहे. तर इंग्लंडचं नेतृत्त्व हॅरी ब्रुक करणार आहे. या मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यासाठी इंग्लंडने एक दिवस आधीच प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे. पाहूया कोणाकोणाला संधी मिळाली आहे.
भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्याच्या एक दिवस आधी, म्हणजेच मंगळवारी इंग्लंडने आपली प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे. डरहम येथे बुधवारी होणाऱ्या या सलामीच्या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर, जोश टंग, सोनी बेकर आणि रेहान अहमद यांची निवड झाली नाही. आर्चर आणि टंग हे २९ जून रोजी संपलेल्या इंग्लंड-न्यूझीलंड कसोटी सामन्यात खेळले होते.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकानंतर इंग्लंडचा संघ पहिल्यांदाच टी-२० सामना खेळणार आहे. त्या स्पर्धेतील त्यांचा शेवटचा सामना भारताविरूद्धचा उपांत्य सामना होता, ज्यात जेकब बेथेलने शतक झळकावूनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या उपांत्य सामन्याच्या तुलनेत इंग्लंडने आपल्या ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये दोन बदल केले आहेत; जोफ्रा आर्चर आणि जेमी ओव्हरटन यांच्या जागी साकिब महमूद आणि ल्युक वुड यांना संधी देण्यात आली आहे. ओव्हरटन दुखापतीतून सावरत आहे आहे; आयपीएल २०२६ मध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळताना त्याला ही दुखापत झाली होती.
इंग्लंडच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये फिल सॉल्ट आणि जोस बटलरसारखे आक्रमक फलंदाज सलामीला आहेत. याव्यतिरिक्त, फलंदाजीची फळी अधिक मजबूत करण्यासाठी टॉम बँटन आणि युवा फलंदाज जेकब बेथेल यांचाही समावेश करण्यात आला आहे. संघात अष्टपैलू खेळाडूंची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, सॅम करन, विल जॅक्स आणि लियाम डॉसन यांसारखे खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर असतील.
फिरकी गोलंदाजीची धुरा अनुभवी आदिल रशीद सांभाळेल, तर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी साकिब महमूद आणि ल्युक वुड यांच्यावर असेल. एकंदरीत, इंग्लंडने पहिल्या टी-२० सामन्यासाठी एक संतुलित संघ निवडला आहे.
इंग्लंडची भारताविरूद्ध पहिल्या टी-२० सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हन
फिल सॉल्ट, जोस बटलर, हॅरी ब्रूक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, साकिब महमूद, आदिल रशीद आणि ल्यूक वुड.
