कसोटी क्रिकेटची थट्टा असं वर्णन होऊ शकेल अशा मेलबर्न इथे झालेल्या सामन्यात इंग्लंडने दुसऱ्याच दिवशी यजमान ऑस्ट्रेलियाला ४ विकेट्सनी नमवलं. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातल्या सगळ्यात कमी कालावधीच्या आणि निकाली ठरलेल्या कसोटींपैकी ही एक आहे. मेलबर्नच्या गोलंदाजांना पोषक खेळपट्टीवर इंग्लंडच्या फलंदाजांनी संयम दाखवत खेळ केला आणि खळबळजनक विजयाची नोंद केली. विजयासाठी मिळालेलं १७५ धावांचं लक्ष्य गाठत इंग्लंडने यजमानांना धक्का दिला.
ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली होती. मात्र इंग्लंडने ही कसोटी जिंकत सन्मान राखला आहे. तिसऱ्या कसोटीनंतर इंग्लंड संघावर जोरदार टीका झाली होती. इंग्लंडने नामुष्की पराभवातून बोध घेत पुनरागमन केलं आहे. तब्बल १५ वर्षानंतर इंग्लंडने ऑस्ट्रेलियात कसोटी जिंकण्याचा पराक्रम केला.
शुक्रवारी, गवत असलेली खेळपट्टी पाहून इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जोफ्रा आर्चरऐवजी गस अटकिन्सनला तर ऑली पोपच्या जागी जेकब बेथेलला संधी देण्यात आली. ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकल्यामुळे पॅट कमिन्सला विश्रांतीचा निर्णय घेतला. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साथ देणारी असल्यामुळे नॅथन लॉयनलाही विश्रांती देण्यात आली. झाय रिचर्डसन आणि मायकेन नेसर यांना संधी मिळाली. स्टीव्हन स्मिथ फिट होऊन परतल्यामुळे जोश इंगलिसला वगळण्यात आलं.
जोश टंगने टिच्चून मारा करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना स्थिरावूच दिलं नाही. त्याने ४५ धावांच्या मोबदल्यात ऑस्ट्रेलियाच्या पाच फलंदाजांना माघारी धाडलं. अटकिन्सनने २ तर ब्रायडन कार्स आणि बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेत टंगला चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियासाठी आठव्या क्रमांकावर खेळणाऱ्या मायकेल नेसरची ३५ धावांची खेळी सर्वाधिक ठरली. ऑस्ट्रेलियाचा डाव ४५.२ षटकात १५२ धावांतच आटोपला.
खेळपट्टीचा अचूक फायदा उठवत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली. इंग्लंडचे फलंदाज याही डावात ढेपाळले. हॅरी ब्रूकने सर्वाधिक ४१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे नेसरने ४ तर स्कॉट बोलँडने ३ विकेट्स घेतल्या. इंग्लंडचा ११० धावांतच गडगडला आणि ऑस्ट्रेलियाला अल्प आघाडी मिळाली. कसोटीच्या पहिल्याच दिवशी तिसरा डाव सुरू झाला. ऑस्ट्रेलियाने वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँडला सलामीला पाठवलं. ट्रॅव्हिस हेड-बोलँड जोडीने एकमेव षटकात विकेटची पडझड होऊ दिली नाही.
दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी उडाली. हेडने संघर्ष करत ४६ धावांची एकाकी झुंज दिली. बाकी फलंदाजांची त्याला साथ मिळू शकली नाही. हेडव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या दोनच फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. ३४.३ षटकात ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव १३२ धावांतच संपुष्टात आला. इंग्लंडतर्फे ब्रायडन कार्सने ४ तर बेन स्टोक्सने ३ विकेट्स पटकावल्या. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर १७५ धावांचं लक्ष्य ठेवलं.
तीन डावातली स्थिती पाहता इंग्लंडचं काय होणार असा प्रश्न होता. मात्र बेन डकेट आणि झॅक क्राऊले यांनी ५१ धावांची खणखणीत सलामी दिली. मिचेल स्टार्कने डकेटला बाद करत ही जोडी फोडली. त्याने ३४ धावा केल्या. इंग्लंडने चहापानापर्यंत मुख्य फलंदाज बाद होऊ नये म्हणून ब्रायडन कार्सला पाठवलं. झाय रिचर्डसनने त्याला फार काळ टिकू दिलं नाही. कार्स बाद झाल्यानंतर जेकब बेथेलने क्राऊलेला चांगली साथ दिली. या दोघांच्या भागीदारीमुळे इंग्लंडने शंभरीचा टप्पा ओलांडला. खेळपट्टीवर नांगर टाकून खेळणाऱ्या क्राऊलेला बोलँडला पायचीत केलं. त्याने ३७ धावांची संयमी खेळी केली.
केवळ पाचवी कसोटी खेळणाऱ्या आणि प्रथम श्रेणी क्रिकेटचा मर्यादित अनुभव असणाऱ्या बेथेलने खेळपट्टीवर टिकून राहत ४० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. बोलँडने बेथेलला बाद करत इंग्लंडला धक्का दिला. झाय रिचर्डसनने अनुभवी जो रूटला तंबूत परतावलं. कर्णधार बेन स्टोक्स इंग्लंडला जिंकून देणार असं वाटत होतं. मात्र मिचेल स्टार्कने १३व्यांदा स्टोक्सला बाद करत इंग्लंडला अडचणीत टाकलं.
संपूर्ण कसोटीत चारही डाव मिळून एकही अर्धशतक नोंदलं गेलं नाही. यावरूनच गोलंदाजांचा किती दबदबा आहे हे लक्षात येतं. कसोटीच्या दोन्ही दिवशी ९०,००० अधिक चाहत्यांनी मैदानात येऊन खेळ पाहिला. कसोटी दोन दिवसात संपल्याने उर्वरित तीन दिवसांचं नुकसान क्रिकेट ऑस्ट्रेलियाला झेलावं लागणार आहे.
