Natalie Sciver Brunt magnetic resonance therapy: इंग्लंडची कर्णधार नताली शिव्हर ब्रंटने टी२० वर्ल्डकपकरता फिट होण्यासाठी मॅग्नेटिक रेझोनन्स थेरपीचा उपयोग केल्याचं स्पष्ट झालं आहे. दुखापतीतून सावरण्यासाठी खेळाडू बर्फाने शेकणे, फिजिओकडून उपचार, ऑक्सिजन थेरपी अशा गोष्टी करतात. महिलांच्या क्रिकेटमध्ये मॅग्नेटिक थेरपी आतापर्यंत कोणी वापरली नव्हती.

इंग्लंडसाठी नतालीचा फिटनेस महत्त्वाचा आहे. तिला पोटऱ्याच्या दुखापतीने सतावलं होतं. त्यातून सावरण्यासाठी तिने मॅग्नेटिक थेरपीचा आधार घेतला. पोटरीच्या दुखावलेल्या स्नायूंना आराम देण्यासाठी नतालीने अनोख्या पद्धतीचा उपयोग केला. आर्थिरिटीसच्या रुग्णांसाठी ही थेरपी वापरली जाते.

नतालीने दुखापतीतून बरं होण्यासाठी सात तासांचं सेशन पूर्ण केलं. घोड्याच्या नाळेच्या आकाराच्या मशीनमध्ये पाय न हलवता बसणं खूप अवघड होतं असं नतालीने सांगितलं. वर्ल्डकपसाठी फिट व्हायचंच होतं, त्यामुळे कठीण असली तरी ही थेरपी घेतली असं नतालीने सांगितलं. तिच्या घरी तसंच हॉटेलमध्ये हे मशीन बसवण्यात आलं आहे.

एनबी खेळाडू शाकील ओ नील याने दुखापतीतून बरं होण्यासाठी या पद्धतीचा उपयोग केला. इलेक्ट्रोमॅग्ननेटिक पद्धतीमुळे पेशींवर सकारात्मक परिणाम होतो. औषधं न घेता रिहॅब प्रक्रिया सुरू होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही प्रक्रिया सुरक्षित आहे. हमखास बरं वाटेल असं नाही पण धोका नक्कीच नाही. खेळाडू सर्वसाधारपणपणे याचा उपयोग करत नाहीत. पण नतालीला वर्ल्डकपसाठी फिट व्हायचंच होतं. तिच्या घरी आणि हॉटेलमध्ये हे मशीन असतं. जेणेकरून ती सेशन्स पूर्ण करू शकली. वर्ल्डकपमध्ये खेळणं ही तिची जिद्द होती. या थेरपीच्या माध्यमातून तिने जिद्दीला पूर्णत्व दिलं.

२९ एप्रिलला डोमेस्टिक क्रिकेट खेळत असताना नतालीच्या पोटऱ्यांना दुखापत झाली. ही दुखापत फार गंभीर नसल्याचं फिजिओंनी सांगितलं. दुखापतीमुळे तिला न्यूझीलंड आणि भारताविरुद्धच्या मालिकेत खेळता आलं नाही. वर्ल्डकपसाठी नियोजित वेळेत फिट होणं आवश्यक होतं. वर्ल्डकपआधी सराव सामनेही होते. त्यादृष्टिकोनातून तिने मॅग्नेटिक थेरपीचा उपयोग करून घेतला. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळताना तिला दुखापत पूर्ण बरी झाली नसल्याचं जाणवलं.