अगम्य डावपेच आणि अनाकलनीय धोरण यामुळे वादग्रस्त ठरलेल्या दौऱ्यात पाकिस्तानला बर्मिंगहॅम कसोटीत पराभवाला सामोरं जावं लागलं. पाकिस्तानचा गोलंदाज रझाउल्लाच्या ८१ धावांच्या खेळीमुळे पराभव लांबला होता. चौथ्या दिवशी जो रूट आणि जॉर्डन कॉक्स यांनी अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

तिसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा पहिला डाव १३३ धावांतच आटोपला. इंग्लंडने ४५३ धावा करत मोठी आघाडी मिळवली. पाकिस्तानने दुसऱ्या डावात ४४९ धावा करत चांगला प्रतिकार केला. माजी कर्णधार शान मसूदने ९५ धावांची सुरेख खेळी केली. कर्णधार बाबर आझमने ७६ धावा केल्या. सलामीवीर अझान अवेसने ५९ तर मोहम्मद अब्बासने ४२ धावा केल्या. रझाउल्ला-अब्बास जोडीने ९व्या विकेटसाठी १२१ धावांची शानदार भागीदारी रचली. नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रझाउल्लाने पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक षटकारांच्या विक्रमाची बरोबरी केली. वेगवान अर्धशतकाचा विक्रमही त्याने नावावर केला. डॅन लॉरेन्सने रझाउल्लाची खेळी संपुष्टात आणली. इंग्लंडतर्फे गस अॅटकिन्सनने ३ विकेट्स घेतल्या. इंग्लंडला विजयासाठी १३० धावा करायच्या आहेत. इमिलो गे आणि बेन डकेट झटपट बाद झाले. मात्र अनुभवी जो रूटने कॉक्सच्या साथीने इंग्लंडला निर्भेळ विजय मिळवून दिला. डॅन लॉरेन्सला सामनावीर तर ओली रॉबिन्सनला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

दुसऱ्या कसोटीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ७ खेळाडू आणि २ प्रशिक्षकांना मायदेशी पाठवलं. वनडे आणि टी२० संघाच्या प्रशिक्षकांकडे कसोटी संघाची जबाबदारी सोपवण्यात आली. पहिल्या कसोटी सलमान अली अघा पाकिस्तानचा कर्णधार होता. दुसऱ्या कसोटीसाठी त्याला संघातून वगळण्यात आलं. तिसऱ्या कसोटीपूर्वी त्याला मायदेशी पाठवण्यात आलं.