England vs New Zealand 2nd Test Playing XI: न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडवर ११५ धावांनी एकतर्फी विजयाची नोंद केली होती. यासह मालिकेत १-० ने आघाडी घेतली. आता मालिकेतील दुसरा सामना १७ जूनपासून ओव्हलमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडकडून प्लेईंग ११ ची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंडच्या टीम मॅनेजमेंटने धक्कादायक निर्णय घेत बेन स्टोक्सला प्लेईंग ११ मधून बाहेर केलं असून, आणखी ३ खेळाडूंना संघाबाहेर ठेवलं आहे.
जो रुटकडे कर्णधारपदाची जबाबदारी
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या प्लेईंग ११ मध्ये ४ बदल करण्यात आले आहेत. या सामन्यासाठी कर्णधारपदाची जबाबदारी जो रुटकडे सोपवण्यात आली आहे. आतापर्यंत बेन स्टोक्स कसोटी संघाचा कर्णधार होता. पण पहिल्या कसोटी सामन्यानंतर बेन स्टोक्स आणि गस एटकिंसनने नियमांचं उल्लंघन केलं होतं. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दोघांनाही प्लेईंग ११ मधून बाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ओली रॉबिन्सन दुखापतग्रस्त आहे, त्यामुळे त्याला प्लेईंग ११ मध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. यासह शोएब बशीरला देखील प्लेईंग ११ मध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडकडून २ खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी दिली जाणार आहे. जॉर्डन कॉक्स आणि सन्नी बेकर हे दोघेही पदार्पण करणार आहेत.
बेन स्टोक्सला चूक महागात पडली
पहिला कसोटी सामना झाल्यानंतर बेन स्टोक्स आणि गस एटकिंसन हे दोघेही वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील ऐतिहासिक विजयानंतर, सोमवारी पहाटे कर्णधार बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज गस एटकिंसन एका नाईटक्लबमध्ये गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, या क्लबमध्ये वाद झाला. स्टोक्सचा रग्बी खेळाडूबरोबर वादाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या वादानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने प्रकरणाची चौकशी केली. या वादानंतर बेन स्टोक्सला कर्णधारपदावरुन काढणार असल्याच्या चर्चा रंगल्या. यासह तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याच्याही चर्चा रंगल्या. आता इंग्लंड क्रिकेट बोर्डाने कारवाई करत बेन स्टोक्सला आणि गस एटकिंसनला प्लेईंग ११ मधून बाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे.
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी असा आहे इंग्लंडचा संघ:
एमिलियो गे,बेन डकेट, जेकब बेथल, जो रूट (कर्णधार),हॅरी ब्रुक, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक),जॉर्डन कॉक्स, जोफ्रा आर्चर, 9 जोश टंग, मॅट फिशर, सन्नी बेकर
