England Cricket Team Record: आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यात इंग्लंड आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना पाकिस्तानने १६४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने दमदार शतकी खेळी केली. या शतकी खेळीच्या बळावर इंग्लंडने २ गडी राखून विजय मिळवला. हा सामना जिंकताच इंग्लंडने सेमी फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. सेमी फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित करताच इंग्लंडने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

इंग्लंडने घडवला इतिहास

या विजयासह इंग्लंडच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. इंग्लंडचा संघ हा सलग पाचव्यांदा आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिलाच संघ ठरला आहे. याआधी कुठल्याही संघाला सलग पाच वेळा सेमी फायनलमध्ये प्रवेश करता आला नव्हता. याआधी पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी प्रत्येकी ४-४ वेळा सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता. पाकिस्तानने २००७,२००९,२०१० आणि २०१२ मध्ये झालेल्या टी -२० वर्ल्डकप स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता. तर श्रीलंकेने २००९,२०१०,२०१२ आणि २०१४ मध्ये झालेल्या स्पर्धेत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता.

इंग्लंडचा संघ २०२६ स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिलाच संघ ठरला आहे. याआधी २०१६ मध्ये झालेल्या टी -२० वर्ल्डकप इंग्लंडने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर २०२१,२०२२,२०२४ आणि २०२६ मध्ये सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०२२ मध्ये झालेल्या टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडने अंतिम फेरीत पाकिस्तानला पराभूत करून जेतेपदाचा मान पटकावला होता.

इंग्लंडचा दमदार विजय

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला ९ गडी बाद १६४ धावा करता आल्या. पाकिस्तानकडून फलंदाजी करताना साहिबजादा फरहानने ६३ धावांची खेळी केली. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी १६५ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडकडून कर्णधार हॅरी ब्रुकने नाबाद १०० धावांची खेळी केली आणि इंग्लडला २ गडी राखून विजय मिळवून दिला.