इंग्लंड संघासाठी २०२५-२६ अ‍ॅशेस मालिका एखाद्या वाईट स्वप्नासारखी ठरली आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने एकतर्फी विजय मिळवत मालिका आपल्या नावे केली आहे. इंग्लंडचा संघ एकही सामना जिंकू शकला नाही, यामुळे संघावर व संघ व्यवस्थापनावर टीका होत आहे. यादरम्यान संघ नव्या वादात अडकला आहे.

पहिल्या तीन सामन्यांमधील पराभव, सलग पाचव्या अ‍ॅशेस ट्रॉफीचा पराभव, मार्क वूड संपूर्ण मालिकेतून बाहेर आणि आता संघावर अनेक आरोप होत आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान इंग्लंड क्रिकेट संघाच्या खेळाडूंवर मद्यपान करून पार्टी केल्याचा आरोप आहे. संघाचे व्यवस्थापकीय संचालक रॉब की यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

रिपोर्ट्सनुसार, इंग्लंडच्या खेळाडूंवर ब्रिस्बेन कसोटीनंतर आणि अ‍ॅडलेड कसोटीपूर्वी नूसा येथे पार्टी केल्याचा आणि अति मद्यपान केल्याचा आरोप आहे. रॉब की यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत आणि त्यांचे मतही व्यक्त केले आहे.

इंग्लंडने अ‍ॅडलेडमधील तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी विश्रांतीदरम्यान वातावरण पुन्हा नॉर्मल करण्यासाठी क्वीन्सलँडच्या किनाऱ्यावर रवाना झाले. खेळाडूंनी जास्त मद्यपान केल्याच्या वृत्तानंतर की यांनी संघाने घेतलेल्या विश्रांतीचा बचाव केला. परंतु अ‍ॅडलेडमधील तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघाने चांगली तयारी केली का यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

बीबीसीच्या अहवालानुसार, “संघातील काही खेळाडूंनी ब्रिस्बेनमध्ये सलग दोन दिवस मद्यपान केल्यानंतर नूसा येथे आणखी चार दिवस पार्टी केली. म्हणजेच या दौऱ्यातील सामन्यापूर्वी जेवढे कसोटी क्रिकेट खेळले गेले, तेवढ्याच म्हणजे सहा दिवस खेळाडूंनी मद्यपानात घालवले.”

अहवालात पुढे नमूद करण्यात आलं आहे की, “इंग्लंडचा संघ अजिबात लपूनछपून वागत नव्हता. रस्त्याच्या कडेला बसून मद्यपान सुरू होतं आणि अनेक खेळाडूंनी पारंपरिक अकुब्रा हॅट घातली होती, जी जणू त्यांच्या सुट्टीचा ‘युनिफॉर्म’च बनली होती.”

या प्रकरणावर भाष्य करताना रॉब की म्हणाले, “जर आमचे खेळाडू बाहेर जाऊन अति मद्यपान करत असल्याचं लोक सांगत असतील, तर अर्थातच आम्ही त्याची चौकशी करू. मी स्वतः मद्यपान करत नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या संघाकडून जास्त प्रमाणात मद्यपान होणं, कोणत्याही टप्प्यावर मला अपेक्षित नाही. आम्ही अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. नेमकं काय घडलं, हे शोधण्यासाठी आमच्याकडे पुरेसे मार्ग आहेत. आतापर्यंत मला जी माहिती मिळाली आहे, त्यानुसार खेळाडूंनी एकत्र बसून जेवण केलं, दुपारचं आणि रात्रीचं जेवण केलं, फार उशिरापर्यंत बाहेर गेले नाहीत. त्यात मला काही गैर वाटत नाही.”

ॲशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात दाखल होण्याआधीच इंग्लंडने हॅरी ब्रूक आणि जेकब बेथेल या दोन खेळाडूंना संघातून वगळलं होतं. न्यूझीलंडमध्ये अंतिम वनडेच्या आदल्या रात्री हे दोघे मद्यपान करताना आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, मालिकेदरम्यान विश्रांती घेणं अत्यावश्यक असल्याचं मत रॉब की यांनी व्यक्त केलं.

की म्हणाले, “हॅरी ब्रूक संपूर्ण हिवाळ्यादरम्यान केवळ सहा दिवस घरी घालवणार आहे. जोफ्रा आर्चर थेट विश्वचषक आणि आयपीएल खेळणार आहे. त्यामुळे विशेषतः मल्टी-फॉरमॅट खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना थोडा ब्रेक घेणं, सामान्य आयुष्य जगणं फार गरजेचं आहे. मात्र जर हे मद्यपान अति प्रमाणात झालं आणि ते जणू एखाद्या स्टॅग पार्टीसारखं असेल, तर ते पूर्णपणे अस्वीकार्य आहे. मद्यपानाची संस्कृती कुणाच्याही फायद्याची ठरत नाही.”