John Turner Announced Retirement From Cricket: इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण वेगवान गोलंदाज जॉन टर्नरने वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली आहे. मुख्य बाब म्हणजे २०२४ मध्ये त्याने इंग्लंडसाठी पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याला ४ सामने खेळण्याची संधी मिळाली. २ वर्षांपूर्वीच त्याच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात झाली होती. ज्या वयात अनेकांना पदार्पण करण्याची संधी देखील मिळत नाही, अशा वयात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या.

निवृत्ती घेण्यामागचं कारण काय?

आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांना वयाच्या ३० व्या वर्षी पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. जॉन टर्नरची कारकिर्द जर वयाच्या २३ व्या वर्षी सुरु झाली होती, तर मग २५ व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा का केली? असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल. त्याने दुखापतीमुळे क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे तो जून २०२५ पासून एकही सामना खेळू शकला नव्हता. तो दुखापतीतून पूर्णपणे फिट होऊ शकला नाही. त्यामुळे त्याने टोकाचं पाऊल उचलत प्रोफेशनल क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

कोण आहे जॉन टर्नर?

जॉन टर्नरचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये झाला. पण त्याच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली. तो हॅम्पशायर संघासोबत करारबद्ध आहे. या संघासोबतचा करार संपायला अजूनही २ वर्ष शिल्लक आहेत. त्याआधीच त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे. दरम्यान २०२४ मध्ये त्याला इंग्लंडकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. इंग्लंडचा संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर असताना त्याने इंग्लंडकडून २ वनडे आणि २ टी-२० सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने ३ गडी बाद केले होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने दमदार कामगिरी केली होती. पण, दुखापतीमुळे त्याला बराच काळ मैदानापासून दूर राहावं लागलं.

निवृत्तीनंतर जॉन टर्नर काय म्हणाला?

निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर जॉन टर्नर म्हणाला, “मी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णयांपैकी एक होता. पाठीच्या स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे मी एक वर्षाहून अधिक काळ मैदानापासून दूर राहिलो आहे. माझ्या दुखापतींनी मला क्रिकेटमधील आणि क्रिकेटबाहेरील माझ्या भविष्याबद्दल विचार करण्यास भाग पाडले. त्यामुळे मला वाटले की, आयुष्यात नवीन आव्हानं स्वीकारण्याची हीच योग्य वेळ आहे.”