ब्रायटन : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सनच्या नावावर बुधवारी एका नकोशा विक्रमाची नोंद झाली. रॉबिन्सनने कौंटी अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेतील एका सामन्यात एका षटकात तब्बल ४३ धावा खर्ची केल्या. कौंटी क्रिकेटमधील हे सर्वांत महागडे, तर प्रथमश्रेणी क्रिकेटच्या इतिहासातील हे दुसरे सर्वांत महागडे षटक ठरले. इंग्लंडसाठी रॉबिन्सनने २० कसोटी सामने खेळले आहेत. कौंटी स्पर्धेत ससेक्सकडून खेळताना द्वितीय श्रेणीच्या लिस्टरशायरविरुद्धच्या सामन्यात रॉबिन्सनने डावातील ५९वे षटक नऊ चेंडूंचे टाकले. या षटकात त्याने तीन नो-बॉल टाकले. तसेच लिस्टरशायरचा फलंदाज लुईस किम्बरने दोन षटकार, सहा चौकार आणि एकेरी धाव काढली. कौंटी स्पर्धेत एका नो-बॉलवर दोन धावा मिळतात. यापूर्वी कौंटी स्पर्धेत एका षटकात सर्वाधिक धावांचा खर्ची करण्याचा नकोसा विक्रम अॅलेक्स टुडोरच्या नावे होता. त्याने १९९८मध्ये सरेकडून खेळताना लँकशायरविरुद्ध ३८ धावा दिल्या होत्या. हेही वाचा >>> कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा : अर्जेंटिना उपांत्यपूर्व फेरीत ; दुसऱ्या साखळी सामन्यात चिलीवर मात रॉबिन्सनचे षटक सुरू झाले, तेव्हा किम्बर ५६ चेंडूत ७२ धावांवर खेळत होता. षटक संपले तेव्हा किम्बरचे शतक पूर्ण झाले होते. षटकाअखेरीस तो ६५ चेंडूंत १०९ धावांवर होता. किम्बरने पुढे जाऊन १२७ चेंडूत २४३ धावांची वादळी खेळी केली. यात त्याने २० चौकार आणि २१ षटकारांची आतषबाजी केली. मात्र, ४६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लिस्टरचा डाव ४४६ धावांत आटोपला. त्यामुळे ससेक्सने १८ धावांनी सामना जिंकला. व्हान्सचा विक्रम अबाधित प्रथमश्रेणी सामन्यात एका षटकात सर्वाधिक धावा खर्ची करण्याचा न्यूझीलंडच्या बेर्ट व्हान्स यांचा नकोसा विक्रम अबाधित राहिला आहे. ऑफ-स्पिनर व्हान्स यांनी न्यूझीलंडमधील शेल करंडक स्पर्धेत १९८९-१९९०च्या हंगामात वेलिंग्टनकडून खेळताना कॅन्टेबरीविरुद्ध एका षटकात तब्बल ७७ धावा खर्ची केल्या होत्या. यात त्यांनी १७ नो-बॉल टाकले होते. व्हान्स यांनी न्यूझीलंडकडून चार कसोटी आणि आठ एकदिवसीय सामने खेळले.