माजी क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्सचे मत

विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात एकापेक्षा एक सरस १५ खेळाडूंचा समावेश असला, तरी यजमान इंग्लंडलाच विजेतेपदाची सर्वाधिक संधी आहे, असे मत दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्सने व्यक्त केले.

इंग्लंड येथे ३० मेपासून विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होत असून या विश्वचषकात सहभागी होणारे १० संघ एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. यापूर्वी १९९२च्या विश्वचषकात या प्रकारच्या स्वरूपाचा अवलंब करण्यात आला होता.

‘‘भारतीय संघातील १५ खेळाडू उत्तम आहेत, यात शंका नाही. परंतु भारताव्यतिरिक्त आणखी सहा संघांना विश्वचषक उंचावण्याची संधी आहे, असे मला वाटते. सामन्याच्या दिवशी तेथील खेळपट्टी आणि वातावरणाशी योग्यप्रकारे जुळवून घेणारा संघच विजयी होईल. मात्र माझ्या मते इंग्लंड विश्वचषकाचा प्रबळ दावेदार आहे,’’ असे ऱ्होड्स म्हणाला.

याव्यतिरिक्त, हार्दिक पंडय़ा आणि जसप्रीत बुमरा हे विश्वचषकात दमदार कामगिरी करतील, असा आशावादही ऱ्होड्से व्यक्त केला. ४९ वर्षीय ऱ्होड्स मंगळवारपासून सुरू होणाऱ्या मुंबई ट्वेन्टी-२० लीगमध्ये नमो बांद्रा ब्लास्टर्स संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची भूमिका बजावणार आहे.