England Announced Playing 11 for IND vs ENG 1st ODI: भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडने एक दिवस आधीच आपली प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे. कर्णधार हॅरी ब्रूकच्या नेतृत्त्वाखाली संघ खेळताना दिसणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना मंगळवारी, १४ जुलैला बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सामन्याच्या एक दिवस आधी हा संघ जाहीर केला.

नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेत इंग्लंडने भारताचा ४-० असा लाजिरवाणा पराभव केला आहे. पण भारतासाठी दिलासादायक गोष्ट म्हणजे संघाची त्रिमुर्ती म्हणजेच रोहित शर्मा, विराट कोहली व जसप्रीत बुमराह संघात परतले आहेत. तर इंग्लंड संघाने टी-२० मालिकेच्या तुलनेत संघात फारसे बदल केलेले नाहीत. पाहूया कशी आहे इंग्लंडची प्लेईंग इलेव्हन.

अनुभवी फलंदाज जो रूट आणि बेन डकेट यांच्या पुनरागमनामुळे फलंदाजीची फळी अधिक बळकट झाली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी मैदानात उतरताच यष्टिरक्षक-फलंदाज जोस बटलर आपल्या कारकिर्दीतील एका अविस्मरणीय टप्प्यावर पोहोचेल. या सामन्यात इंग्लंडचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज जोस बटलर त्याच्या कारकिर्दीतील २०० वा एकदिवसीय सामना खेळणार आहे. त्याने २१ फेब्रुवारी २०१२ रोजी दुबईत पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आता, १३ वर्षांनंतर, हा टप्पा जोस बटलर गाठणार आहे.

दरम्यान इंग्लंडची सलामी जोडी बदललेली दिसणार आहे. इंग्लंडने सलामीची जबाबदारी युवा जेकब बेथेल आणि बेन डकेट यांच्यावर सोपवली आहे, तर जो रूट तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. कर्णधार हॅरी ब्रूक, जोस बटलर आणि सॅम करन मधल्या फळीला बळकटी देतील. गोलंदाजी विभागात जोफ्रा आर्चर वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळेल; त्याच्यासोबत जोश टंग आणि विल जॅक्स, लियाम डॉसन व आदिल रशीद हे फिरकी गोलंदाजांचं त्रिकुट भारतीय फलंदाजांना आव्हान देण्यासाठी सज्ज आहे.

पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग इलेव्हन:

जेकब बेथेल, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक (कर्णधार), जोस बटलर (यष्टिरक्षक), सॅम करन, विल जॅक्स, जोफ्रा आर्चर, लियाम डॉसन, जोश टंग, आदिल रशीद