महासंग्राम!

ज्याची तमाम क्रिकेट विश्व आतुरतने वाट पाहत असते, त्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पारंपरिक अ‍ॅशेस मालिकेला बुधवारपासून प्रारंभ होत आहे. दोन्ही संघ या मालिकेसाठी सज्ज असून जिंकण्याची ईर्षां त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेली पाहायला मिळत आहे.

ज्याची तमाम क्रिकेट विश्व आतुरतने वाट पाहत असते, त्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पारंपरिक अ‍ॅशेस मालिकेला बुधवारपासून प्रारंभ होत आहे. दोन्ही संघ या मालिकेसाठी सज्ज असून जिंकण्याची ईर्षां त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेली पाहायला मिळत आहे. बुधवारपासून या मालिकेला सुरुवात होत असून इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क या दोघांबरोबर प्रत्येक खेळाडूची कसोटी लागणार आहे.
इंग्लंडच्या संघाला घरच्या मैदानांचा नक्कीच फायदा मिळणार आहे. कुकने आतापर्यंत इंग्लंडचे प्रभावी नेतृत्व केले असून तो इंग्लंडला अ‍ॅशेस चषक जिंकवून देतो का, याकडेच साऱ्यांचे लक्ष असेल. इंग्लंडच्या फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगलाच समतोल पाहायला मिळतो. संघामध्ये गुणवान आणि अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. केव्हिन पीटरसनने आपला फॉर्म स्थानिक सामन्यांमध्ये दाखवून दिला आहे. त्याचबरोबर इयान बेल आणि जोनाथन ट्रॉट यांच्यावर इंग्लंडच्या मधल्या फळीची भिस्त असेल. इंग्लंडचा गोलंदाजीचा ताफा हा सध्याच्या क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम असल्याचे म्हटले जात आहे. टीम ब्रेस्नन, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन हे वेगवान त्रिकूट प्रतिस्पध्र्याना मेटाकुटीला आणणारे आहे. त्याचबरोबर गॅ्रमी स्वानसारखा सध्याचा अव्वल दर्जाचा फिरकीपटू आहे.
क्लार्कने आमचा संघ ‘अंडरडॉग्ज’ असल्याचे मान्य केले असल्याने युद्धापूर्वीच शस्त्रे म्यान केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात येत आहे. पण ऑस्ट्रेलियाची ही एक अनोखी चालही असू शकते. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी पाहिली तर त्यांनी रिकी पॉन्टिंग आणि मायकेल हसी यांची उणीव नक्कीच जाणवेल. शेन वॉटसन हा संघाचा हुकमी एक्का आहे. फलंदाजीमध्ये क्लार्क आणि वार्नर यांच्याकडे थोडासा अनुभव आहे. गोलंदाजीमध्ये पीटर सिडल, मिचेल स्टार्क, जेम्स पॅटिन्सन हे तिन्ही वेगवान गोलंदाज आहेत, पण त्यांच्याकडे पुरेसा अनुभव नसल्याचे जाणवते.
दोन्ही संघांचा विचार केल्यास इंग्लंडचा संघ वरचढ आहे. त्यांची फलंदाजी व गोलंदाजी ऑस्ट्रेलियापेक्षा उजवी दिसत आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा फॉर्मही ऑस्ट्रेलियापेक्षा चांगला असून घरच्या वातावरणाचा फायदाही त्यांनाच मिळेल. त्यामुळे यंदाची अ‍ॅशेस इंग्लंडने जिंकल्यास कोणालाही नवल वाटणार नाही.
प्रतिस्पर्धी संघ
इंग्लंड : अ‍ॅलिस्टर कुक (कर्णधार), जो रूट, जोनाथन ट्रॉट, केव्हिन पीटरसन, इयान बेल, जॉनी बेअरस्टोव्ह, मॅट प्रायर (यष्टिरक्षक), ग्रॅमी स्वान, टीम ब्रेस्नन, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन.
ऑस्ट्रेलिया : मायकेल क्लार्क (कर्णधार), शेन वॉटसन, ख्रिस रॉजर्स, डेव्हिड वार्नर, स्टिव्हन स्मिथ, ब्रॅड हॅडिन (यष्टिरक्षक), जेम्स फाऊल्कनर, पीटर सिडल, मिचेल स्टार्क, जेम्स पॅटिन्सन आणि नॅथन लिऑन.
वेळ : दुपारी ३.३० वा.पासून.
थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेटवर.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: England start favourites against australia in ashes