भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत भारताने १-० ने आघाडी घेतली आहे. आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यात पहिला सामना पावसामुळे अनिर्णित ठरला. तर दुसरा सामना भारताने १५१ धावांनी जिंकला. भारताच्या विजयानंतर इंग्लंडने तिसऱ्या कसोटीसाठी संघात काही बदल केले आहेत. तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्टपासून हेडिंग्ले (लीड्स) येथे खेळला जाणार आहे. इंग्लंडने संघातून जॅक क्रॉले, डॉम सिबली, जॅक लीच यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. दुसरीकडे टी २० मध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या डेविड मलानचं कसोटीत पुनरागमन झालं आहे. या व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज साकिब महमूदला संघात स्थान मिळालं आहे. साकिबला तिसऱ्या कसोटी संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.

डेविड मलानने ऑगस्ट २०१८ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्याने आतापर्यंत खेळलेल्या १५ कसोटी सामन्यात त्याने २७.८ च्या सरासरीने ७२४ धावा केल्या आहेत. त्यात एका शतकाचा समावेश आहे. दुसरीकडे साकिबने आतापर्यंत एकही कसोटी सामना खेळलेला नाही. पाकिस्तानविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत त्याने ९ गडी बाद केले होते. ही मालिका इंग्लंडने ३-०ने जिंकली होती.

दरम्यान फलंदाज डॉम सिबली दोन कसोटी सामन्यात पूर्णपणे निष्फळ ठरला आहे. त्याने १४.२५ च्या सरासरीने फक्त ५७ धावा केल्या होत्या. लॉर्ड्समध्ये पहिल्या डावात त्याने ४४ चेंडूत ११ धावा, तर दुसऱ्या डावात त्याला खातंही खोलता आलं नाही. जॅक क्रॉलेला एका कसोटीत खेळण्याची संधी मिळाली. त्याने १६.५० च्या सरासरीने ३३ धावा केल्या होत्या. तर फिरकीपटू जॅक लीचला अंतिम अकरा खेळाडूत स्थान मिळालं नव्हतं. दुसरीकडे अष्टपैलू मोइन अली आणि क्रेग ओव्हरटन या दोघांनी इंग्लंडच्या कसोटी संघातून रिलीज करण्यात आलं आहे. दोन्ही खेळाडू द हंड्रेड स्पर्धेत आपआपल्या संघाकडून खेळणार आहेत. ओव्हरटन साउदर्न ब्रेव संघाचा सदस्य आहे. शुक्रवारी या संघाला एलिमिनेटर सामना खेळायचा आहे.

तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ: जो रूट (कर्णधार), मोइन अली, जेम्स अँडरसन, जॉन बेअरस्टोस रोरी बर्न्स, जोस बटलर, सॅम करन, हसीब हमीद, डॅन लॉरेंस, साकिब महमूद, डेविड मलान, क्रेग ओव्हरटन, ओली पोप, ओली रॉबिन्सन, मार्क वूड