सलामीला तुल्यबळ क्रोएशियाविरुद्ध प्रभावी आक्रमक खेळ करणार्या इंग्लंडला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील दुसर्या सामन्यात घानाचा भक्कम बचाव भेदण्यात अपयश आले. बॉस्टन स्टेडियमवर झालेल्या ‘एल’ गटातील सामन्यात इंग्लंडला गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले. या निकालामुळे इंग्लंडचे बाद फेरीतील स्थान अद्याप निश्चित झाले नसून आता त्यांना अखेरच्या साखळी सामन्यात पनामाविरुद्ध किमान बरोबरीची नोंद करावी लागेल.
जर्मन प्रशिक्षक थॉमस टुकेल यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना इंग्लंडने सलामीच्या सामन्यात क्रोएशियाविरुद्ध संथ सुरुवातीनंतर उत्तरार्धात अप्रतिम खेळ केला होता. त्या सामन्यातील ४-२ अशा विजयानंतर इंग्लंड संघाकडून अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, घानाचा शिस्तबद्ध बचाव व संघटित खेळापुढे कर्णधार हॅरी केन, ज्युड बेलिंगहॅम यांच्यासह इंग्लंडचे सर्वच आक्रमक अपयशी ठरले. इंग्लंडने तब्बल ७८ टक्के वेळ चेंडूचा ताबा आपल्याकडे राखला. त्यांनी गोलच्या दिशेने १९ फटकेही मारले; परंतु त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले.
इंग्लंड संघाने सुरुवातीपासून आक्रमणावर भर दिला, पण त्यांना गोलच्या फारशा संधी निर्माण करता आल्या नाहीत. सामन्याच्या ५७व्या मिनिटापर्यंत इंग्लंडला लक्ष्यावर एकही फटका मारता आला नव्हता. याउलट घानाने बचाव भक्कम ठेवतानाच प्रतिआक्रमणाच्या माध्यमातून काही धोकादायक संधी निर्माण करत इंग्लंडच्या बचाव फळीची परीक्षा घेतली.
बदली खेळाडूंमुळे ऊर्जा
इंग्लंडच्या आक्रमणाला धार नसल्याने प्रशिक्षक टुकेल यांनी उत्तरार्धात पाच बदली खेळाडू वापरले. दुखापतीतून सावरत असलेल्या बुकायो साकाला मैदानात उतरवण्यात आले, तर बेलिंगहॅमच्या जागी मॉर्गन रॉजर्सला संधी देण्यात आली. तसेच गेल्या सामन्यात गोल करणारा मार्कस रॅशफोर्डही मैदानात आला. त्यानंतर इंग्लंडच्या आक्रमणाला काहीशी गती मिळाली. साकाने मारलेल्या जोरदार फटक्याचा घानाचा गोलरक्षक बेंजामिन असारे याने अप्रतिम बचाव करत गोल रोखला. त्यानंतर अन्य बदली खेळाडू निको ओरायली याचा हेडर थेट क्रॉसबारला लागला. मार्क गुएही याचा हेडरही गोलरेषेवरून वाचवण्यात आला. अखेरच्या काही मिनिटांत इंग्लंडने घानावर दडपण राखले, परंतु गोलखाते उघडण्यात त्यांना यश आले नाही.
घानाला पेनल्टी डावलली?
सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात इंग्लंड संघ सातत्याने आक्रमण करत होता. गोलरक्षक जॉर्डन पिकफर्ड वगळता इंग्लंडचे सर्व खेळाडू घानाच्या कक्षातच होते. मात्र यामुळे घानालाही प्रतिआक्रमणाची संधी निर्माण झाली. आक्रमक प्रिन्स क्वाबेना एडू याला इंग्लंडचा बचावपटू एझ्री कोन्सा याने गोलकक्षात पाडले. या वेळी कोन्सा चेंडूपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात होता, मात्र त्याचा चेंडूला स्पर्श झालाच नाही, तो थेड एडूच्या गुडघ्यावर जाऊन आदळला.
या वेळी घानाला पेनल्टी मिळण्याची शक्यता होती. मात्र, घानाच्या अपीलकडे दुर्लक्ष करत पंचांनी खेळ सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. १३ इंग्लंडला विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक १३व्यांदा गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले आहे. या यादीत ब्राझील दुसर्या स्थानावर असून त्यांनी नऊ वेळा गोलशून्य बरोबरी नोंदवली आहे.
१२इंग्लंडची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील (मैत्रीपूर्ण सामने वगळून) सलग १२ विजयांची मालिका खंडित झाली. यापूर्वी ऑक्टोबर २०२४ मध्ये नेशन्स लीगच्या लढतीत इंग्लंडला ग्रीसने १-२ असे पराभूत केले होते.
