पालेकेले : इंग्लंड आणि पाकिस्तान संघ ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील ‘अव्वल आठ’ फेरीतील सामन्यात आज, मंगळवारी एकमेकांविरुद्ध खेळतील, तेव्हा फिरकीपटूंच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे.
इंग्लंडच्या संघाला आतापर्यंत प्रभावी कामगिरी करता आली नसली, तरीही त्यांनी ‘अव्वल आठ’ फेरीतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेला ५१ धावांनी नमविले. त्यामुळे त्यांची निव्वळ धावगतीही सुधारली आहे. सध्या ते गटात अग्रस्थानी आहेत. श्रीलंकेविरुद्ध कमी धावसंख्येचा वचाव करताना इंग्लंडच्या खेळाडूंनी परिस्थितीनुसार आपली रणनीती ठरवली. त्यांच्या फिरकी गोलंदाजांनी या विजयात निर्णायक भूमिका पार पाडली. तर, वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरनेही संघासाठी योगदान दिले.
लेग स्पिनर आदिल रशीद आणि लियाम डॉसन यांनी फलंदाजांना बाद केले. विल जॅक्सने फिरकी गोलंदाजीसह संघासाठी गरजेच्या वेळी धावाही केल्या. सलामीवीर फिल सॉल्टला श्रीलंकेविरुद्ध सूर सापडला. स्पर्धेत प्रथमच त्याने ‘पॉवरप्ले’च्या षटकांनंतरही फलंदाजी केली. मात्र, जोस बटलरची लय संघासाठी चिंतेचा विषय आहे. मात्र, कर्णधार हॅरी ब्रूकचा बटलरवर विश्वास आहे. इंग्लंडने या महिन्याच्या सुरुवातीला याच मैदानावर तीन सामन्यांची ट्वेन्टी-२० मालिका ३-० अशी जिंकली होती. त्याचा फायदा संघाला मिळू शकतो.

