अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडचा निसटता विजय

तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला धूळ चारत ट्वेन्टी-२० मालिका आपल्या नावे केली. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड समोर केवळ १५४ धावांच आव्हान दिले. पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवानने ५७ चेंडूत ७६ धावा केल्या. रिजवान शिवाय पाकिस्तान कडून कोणालाही मोठी खेळी उभारता आली नाही. कर्णधार बाबर आझम देखील झटपट बाद झाला. त्याने केवळ १३ चेंडूत ११ धावा केल्या. इंग्लंड तर्फे अदिल राशीदने सर्वाधिक ३५ धावा देवून ४ गडी बाद केले.

१५४ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामीच्या जोडीने चांगली सुरूवात केली. जॉस बटलर (21), जेसन रॉयने जलद ३६ चेंडूत १२ चौकार आणि १ षटकारासह ६४ धावा ठोकल्या. परंतु, रॉय आउट होताच धावांची गती संथ झाली. सामना हातामधून निसटतोय असे वाटत असताना कर्णधार मॉर्गनने १२ चेंडूत २१ धावांची लहान पण महत्वाची खेळी संघासाठी केली. शेवटी जॉर्डनने ४ रन्स करत सामना आपल्या नावे केला. पाकिस्तानच्या मोहम्मद हाफिजने २८ धावा देत इंग्लंडच्या ३ फलंदाजांना माघारी धाडले.