अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज भारत आणि इंग्लंड संघात तिसरा टी-20 सामना खेळवला गेला. या सामन्यात इंग्लंडने भारतावर 8 गड्यांनी सहज मात केली. भारताच्या 157 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जोस बटलरने दमदार कामगिरी केली. त्याने नाबाद 83 धावांची खेळी करत भारतीय गोलंदाजाची धुलाई केली. या विजयामुळे इंग्लंडने टी-20 मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही.  9 धावांवर जेसन रॉयला युजवेंद्र चहलने रोहित शर्माकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर आलेला डेव्हिड मलान 18 धावांवर बाद झाला. त्याला वॉशिंग्टन सुंदरने बाद केले. या दोघांनतर इंग्लंडच्या संघाने कोणताही दबाव न घेता आक्रमण सुरू ठेवले. जोस बटलर आणि जॉनी बेअरस्टो यांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. बटलरने 52 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 83 तर, बेअरस्टोने 28 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 40 धावा केल्या. बटलरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

भारताचा डाव –

नाणेफेक जिंकून इंग्लंडने विराटसेनेला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. भारताने 20 षटकात 6 गड्यांच्या मोबदल्यात 156 धावा उभारल्या. दोन सामन्यांच्या विश्रातीनंतर रोहित शर्माला आज खेळण्याची संधी मिळाली. त्याने लोकेश राहुलसोबत सलामी दिली. मात्र, तो 15 धावांवर बाद झाला. दुसऱ्या बाजूला असलेला राहुलचा भोपळाही फोडता आला नाही. या दोघांना मार्क वूडने माघारी धाडले. दुसऱ्या टी-20त दमदार खेळी केलेला इशान किशनही (4) या सामन्यात अपयशी ठरला.

सुरुवातीच्या पडझडीनंतर विराट कोहली आणि रिषभ पंत संघासाठी उभे राहिले. दोघांनी छोटेखानी भागीदारी उभारली. दरम्यान चोरटी धाव घेण्याच्या नादात पंत वैयक्तिक 25 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर विराटने एकट्याने किल्ला लढवत संघाची धावगती वाढवली. त्याने 46 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 77 धावा केल्या. इंग्लंडकडून मार्क वूडने 31 धावांत 3 तर, ख्रिस जॉर्डनने 2 बळी घेतले.