छोटय़ा मैदानाचा पुरेपूर फायदा उठवत इंग्लंडने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात न्यूझीलंडवर ४० धावांनी मात केली. इंग्लंडच्या सर्वच फलंदाजांनी तुफानी फटकेबाजी करत संघाची ट्वेन्टी-२० प्रकारातील २१४ ही सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. ल्युक राइटने २० चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ४२ धावा फटकावल्या. इऑन मॉर्गनने २६ चेंडूत ४६ तर जॉनी बेअरस्टोने २२ चेंडूत ३८ धावा केल्या. न्यूझीलंडच्या क्षेत्ररक्षकांनी सोडलेले सहा झेलही इंग्लंडच्या पथ्यावर पडले. या प्रचंड आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने १७४ धावांची मजल मारली. मार्टिन गप्तीलने सर्वाधिक ४४ धावा केल्या.