जेमी वार्डीने सुरुवातीच्या दोन गोलसाठी केलेले साहाय्य, त्यानंतर रचलेला तिसरा गोल यामुळे लिस्टर सिटीने इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये लीड्स युनायटेडचा ४-१ असा पराभव केला. प्रतिस्पर्ध्याच्या मैदानांवर सलग चौथा विजय मिळवणाऱ्या लिस्टर सिटीने गुणतालिकेत १५ गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

गेल्या मोसमात सर्वाधिक गोल करत ‘गोल्डन बूट’चा पुरस्कार पटकावणाऱ्या वार्डीच्या नावावर यंदा सात गोल जमा आहेत. वार्डीच्या पासवर हार्वे बार्नेसने तिसऱ्याच मिनिटाला गोल नोंदवला. लिस्टरचा हा ऑगस्ट २०१७नंतरचा सर्वात वेगवान गोल ठरला. त्यानंतर त्याच्याच गोलसाहाय्यामुळे टौरी टिएलेमान्स याने २१व्या मिनिटाला गोल लगावला. दुसऱ्या सत्रात लीड्सने पुनरागमन करत स्टुअर्ट डल्लासच्या गोलमुळे ४८व्या मिनिटाला ही पिछाडी १-२ अशी कमी केली. पण त्यानंतर वार्डीने ७६व्या मिनिटाला आणि टिएलेमान्सने ९०व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत लिस्टरला विजय मिळवून दिला.

वेरोनाच्या विजयात बराकचे दोन गोल

करोनावर यशस्वी मात केल्यानंतर अँटोनिन बराकने दमदार पुनरागमन केले. त्याच्या दोन गोलमुळे हेल्लास वेरोना संघाने सेरी-ए फुटबॉल स्पर्धेत बेनेव्हेंटोचा ३-१ असा पाडाव केला. या विजयामुळे वेरोनाने सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. वेरोनाच्या बराकने १७व्या आणि ६३व्या मिनिटाला तर डार्को लॅझोव्हिकने ७७व्या मिनिटाला गोल केला. बेनेव्हेंटोकडून जियानलुका लॅपाडुलाने एकमेव गोल लगावला.

युनियन बर्लिनचा विजय

बुंडेसलीगा फुटबॉल

जर्मनीचा माजी आघाडीवीर मॅक्स क्रूस याच्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर युनियन बर्लिनने बुंडेसलीगा फुटबॉलमध्ये हॉफेनहेमचा ३-१ असा पराभव केला. क्रूसने ६०व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत युनियन बर्लिनचे खाते खोलले. त्यानंतर जोएल पोजानपालो (८५व्या मिनिटाला) आणि सेड्रिक टेऊचेर्ट (९४व्या मिनिटाला) यांच्या गोलमध्ये साहाय्यकाची भूमिका बजावली. या विजयासह युनियन बर्लिन नऊ गुणांसह सातव्या स्थानी पोहोचला आहे. हॉफेनहेमची १२व्या क्रमांकावर घसरण झाली आहे.