इंग्लिश प्रीमिअर लीगचे जेतेपद पटकावण्याच्या लिव्हरपूलच्या स्वप्नांचा चुराडा क्रीस्टर पॅलेसने केला आहे. तीन गोलांनी आघाडीवर असूनही लिव्हरपूलला क्रीस्टल पॅलेसविरुद्ध ३-३ अशी बरोबरी पत्करावी लागल्यामुळे त्यांचे जेतेपद धोक्यात आले आहे.
मँचेस्टर सिटीला तीन गुणांनी मागे टाकून लिव्हरपूल जेतेपदाचा दावेदार बनेल, असे वाटले होते. जो अलान (१८व्या मिनिटाला), डॅनियल स्टरिज (५३व्या मिनिटाला) आणि लुइस सुआरेझ (५५व्या मिनिटाला) यांनी सुरेख गोल करून लिव्हरपूलला आघाडीवर आणले होते. मात्र डॅमियन डेलानेय (७९व्या मिनिटाला) याने गोल करून सामन्याात रंगत आणली. त्यानंतर आठ मिनिटांच्या अंतराने ड्वाइट गेलने (८१व्या आणि ८८व्या मिनिटाला) दोन गोल करून सामना बरोबरीत सोडवला. या बरोबरीमुळे लिव्हरपूलचे जेतेपद धोक्यात आल्यामुळे सामना संपल्यानंतर चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. लिव्हरपूलने ३७ सामन्यांत ८१ गुणांसह अग्रस्थान पटकावले असले तरी ३६ सामन्यांत ८० गुणांसह दुसऱ्या स्थानावर असलेल्या मँचेस्टर सिटीला जेतेपद पटकावण्यासाठी पुढील दोन सामन्यांत चार गुणांची आवश्यकता आहे. मँचेस्टर सिटी आणि लिव्हरपूल यांच्यात नऊ गोलांचा फरक असल्यामुळे मँचेस्टर सिटी जेतेपदावर नाव कोरणार, असे चित्र आहे.