Erling Haaland Luxury Bags Collection: सध्या फिफा विश्वचषकात लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, नेमायर, लामिने यामाल व किलियन एम्बाप्पे यांच्या बरोबरीने अजून एका खेळाडूची जोरदार चर्चा आहे. तो खेळाडू म्हणजे नॉर्वेचा एर्लिंग हालांड. नॉर्वेचा स्टार फुटबॉलपटू एर्लिंग हालांड सध्या केवळ २०२६ फिफा विश्वचषकातील दमदार कामगिरीमुळेच नाही, तर आपल्या आलिशान लाइफस्टाइलमुळेही चर्चेत आहे. विशेषतः त्याच्या महागड्या डिझायनर बॅग्सच्या कलेक्शनने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

विश्वचषकादरम्यान मँचेस्टर सिटीचा हा स्टार खेळाडू प्रत्येक प्रवासात वेगवेगळ्या लक्झरी ब्रँडच्या बॅग्ससह दिसून आला. त्याच्या कलेक्शनमध्ये हर्मेस (Hermès), लुई व्हिटॉन (Louis Vuitton), शनेल (Chanel) यांसारख्या जगप्रसिद्ध ब्रँडच्या दुर्मिळ आणि महागड्या बॅग्सचा समावेश आहे.

एर्लिंग हालांडचं दुर्मिळ हर्मेस बर्किन बॅग्सचं कलेक्शन

पेज सिक्सच्या वृत्तानुसार, हालांडकडे किमान सात हर्मेस बर्किन बॅग्स आहेत, ज्या तो अनेकदा सार्वजनिक ठिकाणी वापरताना दिसला आहे. त्यापैकी एक Caban Togo Multipockets HAC Birkin 50 ही लिमिटेड एडिशन बॅग विशेष चर्चेत आहे. ख्रिस्टीजच्या माहितीनुसार, या बॅगच्या एका मॉडेलचा २०२४ मध्ये तब्बल ६०,४८९ अमेरिकी डॉलर (सुमारे ५८ लाख रुपये) इतक्या किमतीत लिलाव झाला होता.

२०२६ फिफा विश्वचषकासाठी नॉर्थ कॅरोलिनामध्ये नॉर्वेच्या संघाच्या विमानातून उतरतानाही एर्लिंग हालांडच्या हातात Hermès HAC Birkin 50 “Endless Road” ही दुर्मिळ बॅग दिसली होती. वळणदार रस्त्याचं आकर्षक लेदर पॅचवर्क डिझाइन असलेल्या या बॅगेची लक्झरी रिसेल मार्केटमधील किंमत ३०,००० ते ५०,००० अमेरिकी डॉलर (सुमारे २९ ते ४८ लाख रुपये) इतकी असल्याचं द डेली स्टारने म्हटलं आहे.

विशेष म्हणजे, या दोन्ही लिमिटेड एडिशन Hermès हर्मेस बर्किन बॅग्स हालांडसाठी केवळ स्टाईल स्टेटमेंट नसून गुंतवणुकीचं साधनही मानल्या जातात. गेल्या दशकात बर्किन बॅग्सच्या पुनर्विक्री मूल्यात तब्बल ९२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हालांडच्या कलेक्शनमध्ये Hermès Black and Orange HAC Birkin 40 सारखी (Bi-colour) मॉडेल्सही आहेत. कॅनव्हास आणि लेदरपासून तयार करण्यात आलेल्या या दुर्मिळ बॅग्सची किंमत २५,००० ते ३५,००० अमेरिकी डॉलर असल्याचं सांगितलं जातं. याशिवाय, त्याच्याकडे Evercalf Toile Cargo HAC 40, HAC 40 Rock यांसारख्या अनेक खास बॅग्सचाही समावेश आहे.

याचबरोबर हालांडकडे Kelly 35 Togo ही आणखी एक प्रसिद्ध हर्मेस बॅगही आहे. वोग हाँगकाँगच्या वृत्तानुसार, यावर्षी स्पेनमध्ये मँचेस्टर सिटी आणि रिअल माद्रिद यांच्यात झालेल्या सामन्यावेळी तो ही क्लासिक बॅग वापरताना दिसला होता.

दुर्मिळ हर्मेस बॅग्सव्यतिरिक्त एर्लिंग हालांडच्या लक्झरी कलेक्शनमध्ये लुई व्हिटॉन आणि शनेल या जगप्रसिद्ध ब्रँड्सच्या महागड्या बॅग्सचाही समावेश आहे. त्याच्याकडे Louis Vuitton 2023 Keepall Bandoulière 50 Comics ही बॅग असून, फारफेचच्या माहितीनुसार तिची किंमत ११,७३२ अमेरिकी डॉलर (सुमारे ११ लाख रुपये) आहे. याशिवाय त्याच्याकडे Louis Vuitton Keepall 50B Landscape आणि Chanel 2024/25 Métiers d’Art Suitcase या आलिशान बॅग्सही आहेत.

याशिवाय, हालांडच्या कलेक्शनमध्ये Goyard Jouvence MM Toiletry Bag ही स्काय ब्लू रंगातील बॅगही आहे. विशेष म्हणजे, या बॅगेचा रंग मँचेस्टर सिटीच्या पारंपरिक स्काय ब्लू जर्सीशी अगदी मिळताजुळता आहे.