Asian Games Esha Singh Wins Silver Medal Women 25m Pistol Report: २५ मीटर एअर पिस्तुल प्रकारात वैयक्तिक फेरीत भारताला रौप्य पदक मिळालं आहे. ईशा सिंगने आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तूल वैयक्तिक अंतिम फेरीत रौप्यपदक जिंकलं. ईशाने अखेरच्या क्षणापर्यंत कडवी झुंज देत सुवर्णपदक पटकावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण अवघ्या एका शॉटसाठी तिचं सुवर्णपदक हुकलं. ईशाने एकूण ३८ गुण मिळवले आणि चीनच्या जियारुईशुआन शियाओसह बरोबरी साधली. मात्र, शूट-ऑफमध्ये चिनी नेमबाजाने बाजी मारत सुवर्णपदक पटकावलं.
या स्पर्धेत ईशा ही भारताची एकमेव खेळाडू होती. मनू भाकेर आणि राही सरनोबत यांना दिवसाच्या सुरुवातीलाच पात्रता फेरीत पोहोचता आलं नव्हतं. ईशाने सुरुवातीपासूनच दमदार कामगिरी केली. मात्र, स्टेज २च्या सहाव्या सिरीजनंतर उत्तर कोरियाच्या सुक ह्यॉन किमसह तिची ३४-३४ गुणांची बरोबरी झाली आणि त्यानंतर शूट-ऑफची वेळ आली.
या शूट-ऑफमध्ये अधिकाऱ्यांकडून वारंवार सामना थांबवण्यात आला. तरीही ईशाने आपला संयम कायम ठेवत सुक ह्यॉन किमविरुद्ध अटीतटीची लढत दिली. अखेर तिने शूट-ऑफ जिंकत सुवर्णपदकासाठीच्या लढतीत प्रवेश केला. मात्र, अंतिम फेरीत चीनच्या नेमबाजाकडून पराभव झाल्याने तिला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.
२१ वर्षीय हैदराबादच्या नेमबाज ईशा सिंगने तब्बल पाच शूट-ऑफ पार करत रौप्यपदकाची कमाई केली. यापैकी चार शूट-ऑफ रौप्य किंवा कांस्यपदकाच्या शर्यतीत झाले, तर आणखी एका शूट-ऑफमधून ती सुवर्णपदकाच्या लढतीत पोहोचली. मात्र, चीनच्या शियाओ जियारुईशुआनविरुद्ध झालेल्या सहाव्या टायब्रेकरमध्ये तिला पराभव पत्करावा लागला आणि चीनच्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकलं.
एक वेळ अशी आली होती की ईशाचं पदकही धोक्यात होतं. ती चौथ्या स्थानावर होती आणि स्पर्धेतून पदकाशिवाय बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, तिने पुढच्या सिरीजमध्ये ५ पैकी ५ शॉट्स अचूक साधत पदक निश्चित केलं.
यानंतर रौप्यपदकाच्या लढतीत उत्तर कोरियाच्या किम ह्यॉन सुकविरुद्ध तिची ३४-३४ गुणांवर बरोबरी झाली आणि सलग टायब्रेकरचा थरार रंगला. पहिल्या दोन शूट-ऑफमध्येही दोघींचे गुण ३-३ असे समान राहिले. मात्र, तिसऱ्या शूट-ऑफमध्ये ईशाने ३-२ असा विजय मिळवत संयम आणि मानसिक ताकद दाखवली आणि रौप्यपदक निश्चित केलं.
