गेल्या दोन मॅरेथॉन स्पर्धापासून पुणे मॅरेथॉनमध्ये पडलेल्या रात्रीच्या शर्यतीत या वेळी इथियोपियाच्या धावपटूंनी बाजी मारली. पुरुष विभागात लेटा गुटेटा (२ तास १७ मिनिटे २७ सेकंद), तर महिला विभागात देरार्टु केबेडे (२ तास ४७.०२ सेकंद) यांनी बाजी मारली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय गटात पुरुष विभागात कालिहास हिरवे, तर महिला विभागात ज्योती गवते विजेते ठरले. परभणीच्या ३५ वर्षीय ज्योतीने सलग तिसऱ्या वर्षी पुणे मॅरेथॉनमध्ये भारतीय विभागात विजेतेपद मिळविले. अर्ध मॅरेथॉन शर्यतीतही इथियोपियाचे वर्चस्व राहिले. मात्र, महिला विभागात पुण्यात सराव करणाऱ्या साताऱ्याच्या रेश्मा केवटेने (१ तास १९ मिनिटे ५४ सेकंद) विजेतेपद मिळवून इथियोपियाच्या वर्चस्वाला तडा दिला.

सारसबाग येथील सणस क्रीडांगणापासून रात्री १२ वाजता मॅरेथॉनला सरहद कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे संयोजक आणि जम्मू-काश्मीरचे माजी मंत्री फिरोज अहमद खान यांच्या हस्ते ४२ किलोमीटर अंतराच्या पूर्ण मॅरेथॉनला निशाण दाखविण्यात आले. या वेळी वंदना चव्हाण, प्रशांत जगताप, रमेश बागवे, सुनील कांबळे, अभय छाजेड, रोहन मोरे, गुरबन्स कौर, सुमंत वाईकर आदी उपस्थित होते.

शर्यतीच्या सुरुवातीपासून इथियोपियाच्या धावपटूंनी एकत्र धावत वर्चस्व राखले होते. सिंहगड रस्त्याने नांदेड सिटीमधून परत सणस मैदान अशा दोन फेऱ्या धावपटूंना पूर्ण कराव्या लागल्या. शर्यतीचा मार्ग सरळ असला, तरी सिंहगड रस्त्यावर सुरू असलेले पुलाचे काम आणि नांदेड सिटीच्या वळणावरील वाहतुकीमुळे खेळाडूंना बऱ्यापैकी त्रास सहन करावा लागला. नांदेड सिटीमधील रहिवाशांनी आतमध्ये प्रवेश करण्यासाठी ताटकळत राहावे लागल्याने संताप व्यक्त केला. धावपटूंच्या दुसऱ्या फेरीला मधूनच वाहतूक सोडण्यात आल्यामुळे धावपटूंना त्यातून मार्ग काढावा लागला. त्यातच नांदेड सिटीमध्ये दिवे बंद करण्यात आल्यामुळे धावपटूंना अंधारातच मार्ग काढावा लागला. या अडचणींवर मात करत परदेशी धावपटूंनी वर्चस्व राखले.
(लेटा गुटेटा)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ethiopian runners dominate pune marathon amy
First published on: 05-12-2022 at 00:10 IST