EURO CUP 2020 : पोर्तुगाल कमनशिबी!

हझार्डच्या गोलमुळे बेल्जियम उपांत्यपूर्व फेरीत

थोरगन हझार्ड

हझार्डच्या गोलमुळे बेल्जियम उपांत्यपूर्व फेरीत

सेव्हिया : जगातील महान फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा युरो चषक फुटबॉल स्पर्धेतील झंझावात अखेर बेल्जियमने रोखला. बेल्जियमने पहिल्या सत्रातच केलेल्या गोलमुळे गतविजेता पोर्तुगाल उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात कमनशिबी ठरला. थोरगन हझार्डच्या गोलमुळे बेल्जियमने पोर्तुगालवर १-० अशी मात करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

केव्हिन डे ब्रूयने, इडेन हझार्ड आणि रोमेलू लुकाकू या आक्रमकवीरांवर बेल्जियमची भिस्त असताना थोरगन हझार्डने ४२व्या मिनिटाला दूरवरून गोल करत बेल्जियमला आघाडी मिळवून दिली. पोर्तुगालचा गोलरक्षक रुइ पॅट्रिसियो याला मात्र हा गोल रोखता आला नाही. पोर्तुगालने अखेरच्या क्षणी गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. रुबेन डायसने हेडरवर मारलेला फटका बेल्जियमचा गोलरक्षक थिबोह कुहत्वा याने अडवला. तसेच राफाएल गुरेरो याने मारलेला फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेला.

पोर्तुगालने संपूर्ण सामन्यात २४ वेळा गोल करण्याचे प्रयत्न केला. पण अग्रमानांकित बेल्जियमने रोनाल्डोला अखेपर्यंत रोखून धरले. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोलचा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी रोनाल्डोसमोर होती. मात्र एकही गोल करता न आल्याने रोनाल्डोने अली डेई यांच्या १०९ गोलच्या विक्रमाशी बरोबरी साधली. हार पत्करल्यानंतर निराश झालेल्या रोनाल्डोने हातातील पट्टा मैदानावर फेकला.

‘‘दुसऱ्या सत्रातील पोर्तुगालचा खेळ पाहिल्यास, आम्ही नशीबवान ठरलो, असेच म्हणावे लागेल. पोर्तुगालने बरोबरी साधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण आम्ही आमच्या खेळावर लक्ष केंद्रित केले होते. पोर्तुगालचे आक्रमण थोपवण्यासाठी आमची बरीच ऊर्जा वाया गेली असली तरी इटलीविरुद्धच्या पुढील सामन्यासाठी आम्हाला सज्ज व्हावे लागेल,’’ असे बेल्जियमचा बचावपटू थॉमस वुहमालेन याने सांगितले.

पोर्तुगालचे सलग दुसरे जेतेपद पटकावण्याचे स्वप्न अधुरे राहिले असले तरी बेल्जियमला पहिल्यावहिल्या जेतेपदाची प्रतीक्षा आहे. १९८० साली युरो चषकाच्या अंतिम फेरीत बेल्जियमला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. बेल्जियमने आतापर्यंत युरो चषकातील चारही सामने जिंकले असून पात्रता फेरीतही १० सामन्यांत विजय मिळवला होता.

१३ बेल्जियम संघ सर्व स्पर्धामध्ये गेल्या १३ सामन्यांत अपराजित राहिला आहे. गेल्या वर्षी नेशन्स लीगमध्ये त्यांना इंग्लंडकडून अखेरची हार पत्करावी लागली होती.

२७ बेल्जियमने गेल्या २७ आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी फक्त एकच पराभव पत्करला आहे.

इंग्लंड-जर्मनी लढतीकडे लक्ष

२५ वर्षांपूर्वी १९९६च्या युरो चषकाच्या उपांत्य फेरीत गॅरेथ साऊथगेट यांची पेनल्टी वाचवत जर्मनीने आगेकूच केली होती. आता या कट्टर प्रतिस्पध्र्यामध्ये मंगळवारी रात्री होणाऱ्या युरो चषकातील उपउपांत्यपूर्व लढतीकडे सर्वाचे

लक्ष लागले आहे. साऊथगेट यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या इंग्लंड संघाला दमदार कामगिरी करता आलेली नाही. जर्मनी संघालाही बाद फेरी गाठण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागले. आतापर्यंत झालेल्या लढतीत दोन्ही संघांनी प्रत्येकी १३ विजय मिळवले असले तरी इंग्लंडने ५१ गोल करत जर्मनीवर (४१ गोल) सरशी साधली आहे.

स्वीडनची युक्रेनशी लढत

भक्कम बचाव आणि आक्रमक खेळ ही ताकद असणाऱ्या स्वीडनची मंगळवारी मध्यरात्री युक्रेनशी लढत होणार आहे. स्पेनविरुद्ध गोलशून्य बरोबरी, स्लोव्हाकियावर १-० असा विजय आणि पोलंडवर ३-२ने मात अशी कामगिरी करत स्वीडनने ‘ई’ गटात अग्रस्थान पटकावले होते. स्वीडनला युरो चषकाच्या बाद फेरीत एकही सामना जिंकता आलेला नसला तरी ही परंपरा खंडित करण्याची संधी त्यांच्यासमोर आहे. युक्रेनला मात्र साखळी फेरीत एक विजय आणि दोन पराभव पत्करावे लागले होते. पण युक्रेनने स्वीडनविरुद्धच्या चार सामन्यांपैकी तीन लढती जिंकल्या असल्यामुळे इतिहास त्यांच्या बाजूने आहे.

डीब्रुएनेला दुखापत

पोर्तुगालविरुद्धच्या सामन्यात गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे बेल्जियमचा अव्वल फुटबॉलपटू केव्हिन डीब्रुएनेचा उर्वरित युरो चषक फुटबॉल स्पर्धेतील सहभाग अनिश्चित मानला जात आहे. पोर्तुगालचा मध्यरक्षक जोआओ पालिन्हा याच्यासह झालेल्या झटापटीदरम्यान डीब्रुएनेचा गुडघा दुखावला गेला. तात्काळ बदली खेळाडूची मागणी करत ४८व्या मिनिटाला डीब्रुएने आत गेला. बेल्जियमचा इडेन हझार्ड मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे अखेरच्या क्षणी खेळू शकला नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Euro 2020 belgium beat portugal 1 0 to enter quarterfinals zws

Next Story
सचिन संपलेला नाही!
ताज्या बातम्या