बेल्जियमने माजी विजेत्या पोर्तुगालच्या संघाला अनेपेक्षित धक्का देत स्पर्धेतून बाहेर काढलं आहे. करो या मरोच्या बाद फेरीतील सामन्यामध्ये बेल्जियमने पोर्तुगालवर १-० ने विजय मिळवत स्पर्धेच्या उपांत्य पूर्व फेरीत धडक मारली आहे. बेल्जियमच्या थोरगन हाझार्डने पहिल्या हाफमध्ये लगावलेला एकमेव गोल हा निर्णायक ठरला. बेल्जियम या संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य राहिला आहे हे विशेष.

राऊण्ड ऑफ १६ म्हणजेच बाद फेरीत तिन्ही सामने बेल्जियमने जिंकले असून ते ब गटामध्ये अव्वल स्थानी आहेत. ग्रुप स्टेजेसच्या सामन्यात त्यांनी तीन सामन्यांमध्ये सात गोल केलेत. दुसरीकडे माजी विजेत्या पोर्तुगालच्या संघाने ग्रुप स्टेजेसमधील तीनपैकी एकच सामना जिंकता आला.

सामन्याच्या ४२ व्या मिनिटाला थोरगन हाझार्डने नोंदवलेला गोल हा सामन्यातील एकमेव गोल ठरला. थोरगन हाझार्डकडे आलेल्या पासचा त्याने योग्य उपयोग करत चेंडू गोलपोस्टच्या दिशेने धाडला आणि फर्स्ट हाफ संपण्यासाठी तीन मिनिटं बाकी असतानाच आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली, जी शेवटपर्यंत कायम राहिली. आता शुक्रवारी बेल्जियमचा सामना इटलीशी होणार आहे.

सामन्यातील आकडेवारी पाहिल्यास पोर्तुलागचा संघ अधिक आक्रामकपणे खेळ्याचं दिसून येतं. बेल्जियमने सहा शॉर्ट्स मारले तर पोर्तुगालच्या त्यांच्या चौपट म्हणजेच २३ शॉर्ट्स मारत गोलचा प्रयत्न केला. शॉर्ट्स ऑन टार्गेटमध्ये बेल्जियमचा एकच शॉर्ट होता जो ४२ मिनिटांचा गोल ठरला. तर दुसरीकडे पोर्तुगालने केलेले चार प्रयत्न अगदी गोलपोस्ट जवळ गेले मात्र त्यांना एकही गोल करता आला नाही. एकूण वेळेपैकी ५८ टक्के वेळा चेंडू पोर्तुगालच्या ताब्यात होता तर बेल्जियमकडे चेंडू ४२ टक्के वेळ होता. बेल्जियमने एकूण ४५१ पास केले तर पोर्तुगालने ५९७ पास केले. बेल्जियमचा संघाला दोन यल्लो कार्ड मिळाले तर पोर्तुगालच्या संघातील तीन खेळाडूंना यल्लो कार्ड मिळाले.