म्युनिक (जर्मनी) : फुटबॉल विश्वातील दुसरी लोकप्रिय युरो चषक स्पर्धा जर्मनीत सुरू होणार आहे. जर्मनी प्रथमच या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. यापूर्वी पश्चिम जर्मनीने १९८८ मध्ये स्पर्धेचे आयोजन केले होते. स्वतंत्रपणे स्पर्धेचे आयोजन करताना जर्मनीसमोर पहिल्या सामन्यात स्कॉटलंडचे आव्हान राहणर आहे.

स्पर्धेच्या स्वरूपात अनेक बदल झाल्यापासून केवळ तिसऱ्यांदा या स्पर्धेत २४ संघ सहभागी होणार आहेत. क्लब फुटबॉल स्पर्धेचा हंगाम संपला असून, आता फुटबॉल प्रेमींचे लक्ष १७व्या युरो स्पर्धेकडे राहणार आहे. यजमान जर्मनी आणि स्पेनने तीन वेळा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. गतविजेते इटली आणि २०१८ मधील विश्वचषक विजेते फ्रान्स यांनी दोन वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले असून, या स्पर्धेतून जॉर्जिया पदार्पण करणार आहे. १५ जूनपासून एक महिनाभर फुटबॉलपटूंचा ९० मिनिटांचा पदन्यास जगभरातील फुटबॉल चाहत्यांना खिळवून ठेवणार आहे.

हेही वाचा >>> IND vs USA: “तू सूर्यकुमारला का आऊट नाही केलंस?”, नवज्योत सिंग सिद्धूने विचारलेल्या प्रश्नावर नेत्रावळकरने दिले उत्तर; म्हणाला- ‘त्याचा झेल…’

जर्मनी विजयी सुरुवातीसाठी उत्सुक

यापूर्वी काय घडले हे विसरून जर्मनी घरच्या मैदानावर विजयी सुरुवात करण्यासाठी उत्सुक आहे. जर्मनी आणि स्कॉटलंड यांच्यात आतापर्यंत १३ सामने झाले असून, स्कॉटलंडने केवळ एकच जिंकला आहे. आम्ही केवळ चर्चा करायला आलेलो नाही. पूर्वी काय घडले यापेक्षा या वेळी काय घडणार आहे हे महत्त्वाचे. आम्ही अनेक चढ-उतार बघितले आहेत. पण, मोठ्या स्पर्धेत उतरल्यावर सुरुवात यशस्वी होणे केव्हाही चांगले. आमच्यासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे, असे जर्मनीचा बचावपटू अँटोनियो रुडिगरने सांगितले.

या स्पर्धेला विशेष महत्त्व असते. अपेक्षा खूप असतात. संपूर्ण जगाचे युरोपियन देशांच्या कामगिरीकडे लक्ष असते. आमची गेल्या काही स्पर्धेतील कामगिरी चांगली नाही, पण या वेळी आम्ही विजयी सुरुवात करण्यास उत्सुक आहोत, असे जर्मनीचे प्रशिक्षक ज्युलियन नागेल्सन म्हणाले.

जर्मनी एक सर्वोत्तम संघ आहे. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि सामन्यांच्या त्यांना अनुभव आहे. अशा मोठ्या स्पर्धात जर्मनीसारखे तगडे संघ आपला सर्वोत्तम खेळ दाखवत असतात, त्यामुळे आमच्यासाठी हा कठिण सामना असेल, असे स्कॉटलंडचा आक्रमक खेळाडू रायन क्रिस्टी म्हणाला. आमचे पहिले लक्ष्य बाद फेरी गाठण्याचे असेल, असेही त्याने सांगितले. हा ‘अ’ गटातील सामना असून हंगेरी आणि स्वित्झर्लंड गटातील दुसरे संघ आहेत.

वेळ : मध्यरात्री १२.३० वा.●थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स टेन २, ३.