Euro Cup 2020: रशियातील करोना स्थितीची बेल्जियम संघाला धास्ती; मागितली घरच्या मैदानावर सरावाची परवानगी

रशियातील करोना स्थिती पाहता बेल्जियम संघाने धास्ती घेतली आहे. त्यामुळे प्रवासाची रणनिती बदलण्यासाठी यूरो कप समितीकडे परवानगी मागितली आहे.

Belgium Team
बेल्जियम संघ आणि समितीला रशियातील करोना स्थितीची धास्ती (Photo Source- Reuters)

चीनमधून उगम पावलेला करोना विषाणूने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलं आहे. त्याचा क्रीडा जगतावरही परिणाम झाला. जवळपास सर्वच स्पर्धा गेल्या वर्षी रद्द करण्यात आल्या. आता करोना नियमावली पाळत स्पर्धा सुरु करण्यात आल्या आहेत. यूरो कप २०२० स्पर्धेवरही करोनाचं सावट आहे. स्पर्धेपूर्वी काही खेळाडूंना करोनाची लागण देखील झाली आहे. त्यामुळे करोनाबाबत नियम आणखी कठोर करण्यात आले आहेत. दुसरीकडे रशियातील करोना स्थिती पाहता बेल्जियम संघाने धास्ती घेतली. त्यांनी प्रवासाची रणनिती बदलण्यासाठी यूरो कप समितीकडे परवानगी मागितली आहे.

यूरो कप २०२० स्पर्धेतील गट ‘ब’ मध्ये पहिल्या सामन्यात रशियाला ३-० ने पराभूत केल्यानंतर बेल्जियमचा दुसरा सामना डेन्मार्कसोबत आहे. कॉम्पहेनमधील पार्केन मैदानात हा सामना गुरुवारी रंगणार आहे. त्यानंतर तीन दिवस रशियात राहण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र रशियात राहण्याऐवजी घरी जाण्याची परवानगी संघ समितीने यूरो कप समितीकडे मागितली आहे. २२ जून रोजी गट ‘ब’ मधील शेवटचा सामना फिनलँडसोबत आहे. त्यामुळे कॉम्पहेनमधील पार्केन मैदानात डेन्मार्क विरुद्धचा सामना संपल्यानंतर थेट दक्षिण ब्रसेलमधील २५ किलोमीटरवर असलेल्या टूबिझ येथे जाण्याची परवानगी मागितली आहे.

फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टर आणि इतर सहा जणांची चौकशी सुरु

“रशियातील करोना स्थिती पाहता तिथे राहणं सोपं नाही. तेथील करोना स्थितीमुळे प्रशिक्षण शिबीरात सराव करणं देखील कठीण आहे. हे पूर्वीपेक्षा अधिक कठीण होत आहे. त्यामुळे खेळाडू आणि स्टाफच्या प्रकृतीची चिंता आम्हाला सतावत आहे. त्यामुळे आम्ही टुबिझ येथे गेल्यास आम्हाला सराव करण्यास कोणतीच अडचण येणार नाही. ते आमच्यासाठी सुरक्षित आहे”, असं बेल्जियम फुटबॉल असोसिएशनने सांगितलं आहे.

PSL: ‘त्या’ धडकेनंतर फाफ ड्यूप्लेसिसला ‘मेमरी लॉस’चा त्रास; ट्विटरवरुन चाहत्यांना दिली माहिती

यूरो कप २०२० स्पर्धेतील बहुतांश सामने हे रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथील मैदानात होणार आहेत. एप्रिल महिन्यात डब्लिन मैदान कोविड स्थितीमुळे वगळण्यात आलं होतं. त्यानंतर तेथील सर्व सामन्यांचं आयोजन सेट पीटर्सबर्ग मैदानात करण्यात आलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Euro cup 2020 belgium football team fear to russia travel request to change plan rmt