यूरो कप २०२० स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना इंग्लंड आणि डेन्मार्क यांच्यात रंगणार आहे. लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर हा सामना आज रात्री साडेबारा वाजता सुरू होईल. तब्बल २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हो दोन्ही संघ यूरो कपचा उपांत्य सामना खेळणार आहेत. उपांत्य फेरीचा घाट चढून अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक असतील.
गॅरेथ साऊथगेट यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या इंग्लंडने गटात अग्रस्थान मिळवून दिमाखात बाद फेरी गाठली. त्यानंतर उपउपांत्यपूर्व लढतीत जर्मनी आणि उपांत्यपूर्व सामन्यात युक्रेनचा धुव्वा उडवला. २०१८च्या फिफा विश्वचषकात इंग्लंडला उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले. यंदा मात्र सुरुवातीपासूनच त्यांना चाहत्यांचा उदंड प्रतिसाद लाभत असून घरच्या प्रेक्षकांसमोर खेळून प्रथमच अंतिम फेरीत धडक मारण्याची सुवर्णसंधी त्यांच्याकडे आहे.
So close they can taste it…
Will # or # secure their spot in Sunday’s final #EURO2020 #EUROfixtures @bookingcom— UEFA EURO 2020 (@EURO2020) July 7, 2021
हेही वाचा – COPA AMERICA 2021 : कोलंबियाला हरवत अर्जेंटिनाची अंतिम फेरीत धडक
दुसरीकडे, कॅस्पर हुलमंड यांच्या डेन्मार्कने गटसाखळीत अवघा एक सामना जिंकून बाद फेरी गाठली. परंतु त्यानंतर आक्रमक खेळाच्या बळावर त्यांनी अनुक्रमे वेल्स, चेक प्रजासत्ताक यांचे आव्हान संपुष्टात आणून अन्य संघांना इशारा दिला. त्यामुळे आता १९९२मध्ये विजेतेपद मिळवल्यानंतर पहिल्यांदाच युरो चषकाच्या अंतिम फेरीत धडक मारण्याचे त्यांना वेध लागले आहेत. त्याशिवाय जगभरातील चाहत्यांचा भावनिक पाठिंबासुद्धा डेन्मार्कला लाभत असल्याने ते कशाप्रकारे मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
दोन्ही संघांतील महत्त्वाचे मुद्दे
- इंग्लंड आणि डेन्मार्क यांच्यात आतापर्यंत २१ सामने झाले असून इंग्लंडने १२ लढती जिंकल्या आहेत. डेन्मार्कने चार सामन्यांत विजय मिळवला असून उर्वरित पाच लढती बरोबरीत सुटल्या आहेत.
- यूरो आणि फिफा विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धामध्ये उभय संघ तिसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत. यापूर्वी १९९२ मध्ये बरोबरी, तर २००२ मध्ये झालेल्या लढतीत इंग्लंडने विजय मिळवला होता.
- इंग्लंडविरुद्ध आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघाने एकही गोल झळकावलेला नाही. त्याउलट डेन्मार्कने गेल्या तीन लढतींमध्ये सर्वाधिक १० गोल नोंदवले आहेत. त्यामुळे चाहत्यांना कडवी झुंज पाहायला मिळू शकते.
कुठे पाहता येणार सामना?
टीव्हीवर हा सामना सोनी टेन २ एसडी आणि एचडी, सोनी टेन ३ एसडी आणि एचडी (हिंदी) पाहता येईल. मोबाईलवर हा सामना सोली लीव, जिओ टीव्ही या अॅपवर पाहता येईल.
कुठे रंगणार सामना?
लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे.
सामन्याची वेळ
भारतीय वेळेनुसार बुधवारी रात्री (८ जुलै) साडेबारा वाजता.