यूरो कप २०२० स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून आज बाद फेरीतील सामन्यांचा शेवटचा दिवस आहे. आजच्या पहिल्या सामन्यात इंग्लंड जर्मनीशी, तर स्वीडन युक्रेनशी भिडणार आहे. या चार संघाची उपांत्यपूर्व फेरीतील दोन स्थानांसाठी धडपड चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. स्वित्झर्लंड, स्पेन, इटली, चेक रिपब्लिक आणि डेन्मार्क हे संघ आधीच उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. दुसऱ्या बाजूला गतविजेता पोर्तुगाल आणि बलाढ्य फ्रान्स स्पर्धेबाहेर पडल्याने या स्पर्धेला यंदा नवा विजेता मिळणार आहे.

 

इंग्लंड विरुद्ध जर्मनी

बाद फेरीत आज वेम्बली स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध जर्मनी सामना रंगणार आहे. दोघेही संघ युरोपात ताकदवान मानले जातात. इंग्लंडने आपल्या गटात अव्वल स्थान राखले असून त्यांनी आत्तापर्यंतच्या ३ सामन्यात २ विजय मिळवले आहेत. तर जर्मनीने एक विजय, एक पराभव आणि एक बरोबरी राखण्यात यश मिळवले आहे. चेक रिपब्लिकप्रमाणे जर्मनीने बाद फेरीत स्थान मिळवले होते. आत्तापर्यंत हे दोन संघ मोठ्या स्पर्धेत अनेकवेळा एकत्र आले होते. या दोघांमध्ये झालेल्या ११ सामन्यात जर्मनीने ६ विजय मिळवले आहेत.

हेही वाचा – VIDEO: विम्बल्डनच्या मैदानावर करोनाची लस बनवणाऱ्या वैज्ञानिकांनी पाऊल ठेवलं अन्….

स्वीडन विरुद्ध युक्रेन

ग्लासगोच्या स्टेडियमवर स्वीडन आणि युक्रेन आमनेसामने असतील. स्पर्धेत स्वीडनचा संघही त्यांच्या गटात अव्वल असून ते आत्तापर्यंत अजिंक्य राहिले आहेत. स्वीडन आणि युक्रेन आत्तापर्यंत चार वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी तीन वेळा युक्रेनने बाजी मारली आहे. २०१२च्या यूरो कप स्पर्धेत यांनी शेवटचा सामना खेळला होता. यात युक्रेनने २-१ अशी सरशी साधली. स्पेनने त्यांच्या गटातील शेवटच्या सामन्यात पोलंडवर ३-२ ने विजय मिळवला होता. तर युक्रेनने गटातील शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रियाकडून ०-१ ने पराभव पत्करला होता.

आजचे सामने –

  • इंग्लंड वि. जर्मनी (रात्री साडेनऊ वाजता)
  • स्वीडन वि. युक्रेन (मध्यरात्री साडेबारा वाजता)