scorecardresearch

Euro Cup 2020 : इंग्लंड उपांत्यपूर्व फेरीत, जर्मनी स्पर्धेबाहेर

लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर इंग्लंडने जर्मनीला २-० अशी मात दिली.

Euro Cup 2020 : इंग्लंड उपांत्यपूर्व फेरीत, जर्मनी स्पर्धेबाहेर
इंग्लंडची जर्मनीवर मात

यूरो कप २०२० स्पर्धेत घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या बाद फेरीच्या सामन्यात इंग्लंडने जर्मनीला २-० अशी मात देत उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली आहे. चाहत्यांनी तुडूंब भरलेल्या वेम्बली स्टेडियमवर हा सामना रंगला. सामन्यातील पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत होेते.  दुसऱ्या सत्रात इंग्लंडने आपला दर्जा राखत दोन गोल केले. जर्मनीचा स्टार आणि अनुभवी खेळाडू थॉमस म्यूलरला गोल करण्याची खूप सोपी संधी होती, मात्र ती त्याने सोडली. त्यानंतर रहीम स्टर्लिंग आणि कर्णधार हॅरी केनने गोल करत जर्मनीला स्पर्धेबाहेर ढकलले. १९६६च्या वर्ल्डकपनंतर स्पर्धात्मक फुबॉलमध्ये इंग्लंडने प्रथमच वेम्बली स्टेडियमवर जर्मनीविरुद्ध सामना जिंकला आहे. स्वित्झर्लंड, स्पेन, इटली, चेक रिपब्लिक आणि डेन्मार्क हे संघ आधीच उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. दुसऱ्या बाजूला गतविजेता पोर्तुगाल आणि बलाढ्य फ्रान्स स्पर्धेबाहेर पडल्याने या स्पर्धेला यंदा नवा विजेता मिळणार आहे.

 

दुसरे सत्र

दुसऱ्या सत्रात जर्मनीने आपले आक्रमण वाढवले. ४९व्या मिनिटाला जर्मनीला पहिला गोल करण्याची संधी होती, मात्र इंग्लंडटा गोलकीपर पिकफोर्डने तो गोल वाचवला. ६०व्या मिनिटाला इंग्लंडच्या साकाला गोल करण्याची संधी होती, मात्र जर्मन बचावपटूंनी तो अडवला. ७०व्या मिनिटाला जर्मनीचा स्टार आणि अनुभवी खेळाडू थॉमस म्यूलरला गोल करण्याची खूप सोपी संधी होती, पण त्याने मोक्याच्या वेळेत नियंत्रण गमावले. ७५व्या मिनिटाला इंग्लंडचा फॉरवर्ड रहीम स्टर्लिंगने दमदार गोल नोंदवत चाहत्यांना खूष केले. या गोलनंतर इंग्लंडने आत्मविश्वासाने आणि जलद पास करत खेळायला सुरुवात केली. पहिल्या सत्रात शांत असणारा इंग्लंडला कर्णधार हॅरी केनने ८६व्या मिनिटाला हेडरने सुंदर गोल करत इंग्लंडचा विजय निश्चित केला. अतिपरिक्त चार मिनिटांचा खेळ वाढवण्यात आला, पण तोपर्यंत उशीर झाला होता.

पहिले सत्र

सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला पहिला कॉर्नर जर्मनीला मिळाला. मात्र, त्यांना सलामी देता आली नाही. सातव्या मिनिटाला इंग्लंडच्या डॅक्लन राइसला पिवळे कार्ड दाखवण्यात आले. मात्र जर्मनीला या संधीचा फायदा उचलता आला नाही. १५व्या आणि १६व्या मिनिटाला जर्मनीचा गोलकीपर न्यूअरने दोन गोल वाचवले. २४व्या मिनिटाला जर्मनीच्या जिंजरला पिवळे कार्ड मिळाले. मागील सामन्यातही त्याला पिवळे कार्ड मिळाल्यामुळे तो पुढील सामना खेळू शकणार नाही. ४१व्या मिनिटाला जर्मनीच्या खेळाडूंनी इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनला पाडले. त्यामुळे इंग्लंडला फ्री किक मिळाली. या किकवर इंग्लंडचा संघ गोल करण्यात अपयशी ठरला. पुढच्या मिनिटाला इंग्लंडच्या कॅल्विन फिलिप्सला पिवळे कार्ड मिळाले.

 

 

इंग्लंड विरुद्ध जर्मनी

याआधी लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर हे दोन्ही संघ १३ वेळा समोरासमोर आले होते. त्यात पहिल्या पाच सामन्यात इंग्लंडने चार वेळा विजय मिळवला आहे. या विजयात १९६६ वर्ल्डकप फेरीच्या अंतिम सामन्याचाही समावेश आहे.  वेम्बली स्टेडियमवर हा ३००वा आंतरराष्ट्रीय सामना होता.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या