Euro Cup 2020 Live: चेक रिपब्लिकच्या आक्रमक खेळीपुढे स्कॉटलँडचा संघ गारद

यूरो कप २०२० स्पर्धेत चेक रिपब्लिकने स्कॉटलँड संघाला २-० ने पराभूत केलं. ‘ड’ गटातील दुसरा साखळी सामना होता.

Scotland Vs Czech Republic
यूरो कप २०२० स्पर्धेत स्कॉटलँड विरुद्ध चेक रिपब्लिक यांच्यात सामना
यूरो कप २०२० स्पर्धेतील ‘ड’ गटातील साखळी सामन्यात चेक रिपब्लिक संघाने स्कॉटलँड संघाला २-० ने पराभूत केलं. या सामन्यात चेक रिपब्लिक संघाचा आक्रमकपणा दिसून आला. पॅट्रिक चिकने दोन गोल मारत संघाला २-० ने आघाडी मिळवून दिली. त्यामुळे स्कॉटलँडचा संघ दडपणाखाली होता. चेक रिपब्लिकच आक्रमकपणा मोडून काढण्यात स्कॉटलँड संघाला अपयश आलं. या विजयानंतर चेक रिपब्लिक संघाला इंग्लंड आणि क्रोएशिया या दोन तगड्या संघाचं आव्हान असणार आहे. स्कॉटलँडने या सामन्यासाठी ३-५-२ अशी व्यूहरचना आखली होती. तर चेक रिपब्लिक ४-२-३-१ या रणनितीसह मैदानात उतरला होता. करोना स्थितीमुळे मोजक्या प्रेक्षकांना मैदानात उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती.

दुसऱ्या सत्रातही चेक रिपब्लिक संघ आक्रमकपणे खेळत राहिला. त्यामुळे आधीच दडपणाखाली असलेल्या स्कॉटलँड संघाची दमछाक झाली आहे. दुसऱ्या सत्रात आणखी एक गोल करत चेक रिपब्लिकने स्कॉटलँडवर २-० ने आघाडी मिळवली आहे. ५२ व्या मिनिटाला पॅट्रिक चिकने संघाचा आणि वैयक्तिक दुसरा गोल झळकावला.

पहिल्या सत्रात चेक रिपब्लिक संघाचा आक्रमपणा दिसून आला. ४२ व्या मिनिटाला पॅट्रिक चिकनं गोल करत संघाला एका गोलची आघाडी मिळवून दिली. त्याच्या गोलने स्कॉटलँड संघला दडपणाखाली आणलं. दुसऱ्या सत्रात आता गोल करून बरोबरी साधण्याचं आव्हान स्कॉटलँड संघासमोर होतं. मात्र त्यांना संधी मिळाली नाही.

चेक रिपब्लिक आणि स्कॉटलँड संघाला बाद फेरीत पोहोचण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे. स्कॉटलँडवर २ गोलने विजय मिळवल्यानंतर ‘ड’ गटातील गुणतालिकेत चेक रिपब्लिकचा संघ आघाडीवर पोहोचला आहे. त्याखालोखाल इंग्लंडचा संघ आहे. त्यानंतर क्रोएशिया आणि स्कॉटलँडचा क्रमांक आहे.


फिफा क्रमवारीत स्कॉटलँडचा संघ ४४ व्या स्थानावर, तर चेक रिपब्लिकचा संघ ४० व्या स्थानावर आहे. स्कॉटलँडचा विश्वचषक आणि यूरो कप या दोन मोठ्या स्पर्धेतील ११ वा सामना आहे. स्कॉटलँडने गेल्या नोव्हेंबरमध्ये सर्बियाविरुद्धच्या प्लेऑफ सामन्यात विजय मिळवल्यानंतर यूरो २०२० स्पर्धेसाठी पात्र झाला होता.

स्कॉटलँडचा संघ- डी मार्शल (गोलकिपर), जे हेनड्री, जी हेनले. एल. कुपर, एस. ओडोनेल, एस. आर्मस्ट्राँग, जे. मॅक गिन, एस. मॅक टॉमिने, ए. रॉबर्टसन, एल. डायक्स, आर. ख्रिश्ची

चेक रिपब्लिकचा संघ- टी. वॅकलिक (गोलकिपर), व्ही. कॉफल, ओ. सेलुस्तका, कलास, बोरील, क्राल, टी. सोसेक, मॅसोपस्ट, व्ही. डॅरीडा, जे. जनकटो, पी. चिक

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Euro cup 2020 football match between scotland and czech republic live update rmt