यूरो कप २०२० स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्पेनला नमवत इटलीने अंतिम फेरीत धडक मारली आहे. ९० मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गोल करण्यात यश आलं. त्यानंतर अतिरिक्त वेळेतही हीच स्थिती होती. त्यामुळे सामना पेनल्टी शूटआउटमध्ये गेला. पेनल्टी शूटआउटमध्ये इटलीने स्पेनचा ४-२ ने पराभव केला. दोन्ही संघाच्या खेळाडूंना पेनल्टी शूटआउटमध्ये पहिला गोल करण्यात अपयश आलं. त्यानंतर इटलीने तीन गोल केले. तर स्पेनने दोन गोल केल्यानंतर चौथा गोल हुकला. त्यानंतर इटलीच्या जोर्जिन्होनं पेनल्टी शूटआउटमधला विजयी गोल मारला आणि संघाला अंतिम फेरीत पोहोचवलं.

पहिल्या सत्रात दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी ठरले होते. मात्र दुसऱ्या सत्रात इटलीने आक्रमक खेळी करत ६० व्या मिनिटाला गोल झळकावला. इटलीच्या इमोबिलनं पास केलेला बॉल फेडरिको चिसानं गोलमध्ये रुपांतरीत केला. त्यानंतर स्पेनच्या संघावर दडपण आलं. हे दडपण कमी करण्यासाठी स्पेनच्या खेळाडूंची धडपड सुरु होती. स्पेनच्या खेळाडूंना ८० व्या मिनिटाला य़श आलं. स्पेनच्या डि ओएलमोने पास केलेला बॉल अलवारो मोराटाने गोलमध्ये मारला आणि बरोबरी साधली. त्यामुळे दोन्ही संघात विजयी गोल मारण्यासाठी धडपड सुरु झाली. मात्र विजयी आघाडी घेण्यात ९० मिनिटं संपली. त्यानंतर अतिरिक्त वेळ देण्यात आली. मात्र त्यातही दोन्ही संघांना विजयी गोल करण्यात अपयश आल्याने सामना पेनल्टी शूटआउटमध्ये गेला.

इटली विरुद्ध स्पेन उपांत्य फेरीच्या सामन्यातील पहिल्या सत्रात दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी ठरले. पहिल्या सत्रात इटलीच्या ताब्यात ३४ टक्के बॉल म्हणजेच १८४ वेळा पास करण्यात यश मिळालं. तर स्पेनच्या ताब्यात ६६ टक्के बॉल म्हणजेच ३५३ वेळा बॉल पास करण्यात यश आलं. स्पेनची पास अचूकता ९० टक्के होती. तर इटलीची पास अचूकता ही ७८ टक्के होती. पहिल्या सत्रात इटलीला ३ ऑफसाइट्स मिळाले. तर स्पेनला एक कॉर्नर मिळाला. मात्र दोन्ही संघ पहिल्या सत्रात गोल करण्यात अपयशी ठरले. या सामन्यासाठी इटली आणि स्पेनने मैदानात खेळाडूंची ४-३-३ अशी व्यूहरचना आखली होती.

साखळी फेरीत इटलीने टर्की, स्वित्झर्लंड आणि वेल्सला पराभूत करत बाद फेरीत धडक मारली होती. त्यानंतर बाद फेरीत ऑस्ट्रियाचा २-१ ने पराभव केला होता. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमचा २-१ ने धुव्वा उडवला. आता उपांत्य फेरीत स्पेनला पराभूत करत इटलीने अंतिम फेरीत धडक मारली आहे.

इटलीने यापूर्वी १९६८ मध्ये यूरो कप जिंकला होता. इटलीने अंतिम फेरीत यूगोस्लावियाकाचा २-० ने पराभव करत आपल्या नावावर चषक केला होता. त्यानंतर आतापर्यंत चषक जिंकता आला नाही. यूरो कप २००० च्या अंतिम फेरीत इटलीने धडक मारली होती, मात्र फ्रान्सकडून २-१ पराभव सहन करावा लागला होता. त्यानंतर यूरो कप २०१२ च्या अंतिम फेरीत धडक मारली. मात्र तिथेही त्यांच्या पदरी निराशा पडली होती. स्पेननं इटलीचा ४-० ने धुव्वा उडवला होता. यंदाच्या यूरो चषकात इटली चांगल्या फॉर्मात आहे. अंतिम फेरीत इंग्लंड विरुद्ध डेन्मार्क सामन्यातील विजेत्यासोबत लढत असणार आहे. इटलीला अंतिम सामन्यात विजय मिळवत ५३ वर्षांपूर्वीचा इतिहास प्रस्थापित करण्याची संधी आहे.