दमदार आक्रमण आणि भक्कम बचावाच्या जोरावर डेन्मार्कने वेल्सचा पाडाव करत यूरो कप २०२०च्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. स्पर्धेचा बाद फेरीतील पहिला सामना वेल्स आणि डेन्मार्क यांच्यात खेळवला गेला. वेल्सच्या गॅरेथ बेले आणि रामसे या सुपरस्टार खेळाडूंना शांत ठेवत, डेन्मार्कने ४-० असा विजय मिळवला. अ‍ॅम्स्टरडॅम अरेनावर रंगलेल्या सामन्यात डेन्मार्कला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त पाठिंबा लाभला. २३ वर्षीय युवा खेळाडू कॅस्पर डोलबर्गने २ गोल करत डेन्मार्कच्या विजयाचा पाया रचला आणि वेल्सला स्पर्धेबाहेर ढकलले.

दुसरे सत्र

पहिल्या सत्रात आघाडी घेतलेल्या डेन्मार्कने दुसऱ्या सत्रातही आपली धडाकेबाज कामगिरी सुरू ठेवली. ४८व्या मिनिटाला डोलबर्गने सामन्यातील आणि वैयक्तिक दुसरा गोल करत वेल्सला पिछाडीवर ढकलले. या सत्रात वेल्सने पुनरागमन करण्यासाठी अनेक पर्यायी खेळाडू मैदानात उतरवले. ७८व्या मिनिटाला वेल्सच्या डेव्हिड ब्रुक्सला पिवळे कार्ड मिळाले. त्यामुळे डेन्मार्कला फ्री किक मिळाली, पण त्यांना तिसरा गोल करता आला नाही. ८२व्या मिनिटाला वेल्सकडून स्वयंगोल होता होता राहिला. ८५व्या मिनिटाला डेन्मार्कच्या ब्रेथवेटने हेडरने गोल करण्याची संधी चुकवली. जाकीम मायलेने ८८व्या मिनिटाला डेन्मार्कसाठी तिसरा गोल केला. ९०व्या मिनिटाला डेन्मार्कच्या खेळाडूला पाडल्यामुळे वेल्सच्या हॅरी विल्सनला लाल कार्ड मिळाले. अतिरिक्त वेळेत मार्टिन ब्रेथवेटने गोल केल्यामुळे डेन्मार्कच्या खात्यावर चौथा गोल नोंदवता आला.

 

 

पहिले सत्र

तब्बल १६ प्रेक्षकांच्या उपस्थित हा सामना सुरू झाला. वेल्सचा कर्णधार आणि स्टार खेळाडू गॅरेथ बेलला ९व्या मिनिटाला पहिला गोल करण्याची सुवर्णसंधी होती, मात्र त्याने मारलेला फटका गोलपोस्टच्या फार जवळून गेला. १९व्या मिनिटाला डेन्मार्कला लागोपाठ तीन कॉर्नर मिळाले, पण त्यांना गोल करता आला नाही. २५व्या मिनिटाला वेल्सच्या रोडॉनला पिवळे कार्ड मिळाले. २७व्या मिनिटाला युवा कॅस्पर डोलबर्गने डेन्मार्कसाठी अप्रतिम गोल करत आघाडी मिळवली. मिक्केल डॅम्सगार्डच्या असिस्टवर डोलबर्गने हा गोल नोंदवला. ३१व्या आणि ३४व्या मिनिटाला डेन्मार्कला गोल करण्याची संधी होती, पण त्यांनी ती सोडली. ३९व्या मिनिटाला वेल्सला दुसरे पिवळे कार्ड मिळाले. किफर मुरला हे कार्ड दाखवण्यात आले.

 

वेल्स आणि डेन्मार्कचा प्रवास

यूरो कप स्पर्धेतील साखळी फेरीत वेल्सचा स्वित्झर्लंडविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर वेल्सने टर्कीला २-० ने पराभूत केले होते. तसेच इटलीकडून १-० ने पराभव झाला होता. तर डेन्मार्कने फिनलँडला १-० ने पराभूत केले होते. दुसऱ्या सामन्यात बेल्जियमकडून २-१ ने पराभव सहन करावा लागला होता. त्यानंतर रशियाला ४-१ ने पराभूत करत बाद फेरीत धडक मारली होती. वेल्स विरुद्ध डेन्मार्क संघ आतापर्यंत १० वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी वेल्सने ४, तर डेन्मार्कने ६ सामन्यात विजय मिळवला आहे. नोव्हेंबर २०१८ नंतर पहिल्यांदाच हे दोन संघ आमनेसामने आले होते. नॅशनल लीग स्पर्धेत डेन्मार्कने वेल्सला २-१ ने पराभूत केले होते.