तब्बल ४३ मिनिटे १० जणांसह लढा देत बलाढ्य स्पेनला १-१ असे बरोबरीत रोखल्यानंतर गोलरक्षक यान सोम्मेरने केलेल्या शानदार कामगिरीनंतरही स्वित्झर्लंडला युरो चषक फुटबॉल स्पर्धेत पहिल्यांदा उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले. पेनल्टी-शूटआऊटपर्यंत रंगलेल्या उत्कंठावर्धक लढतीत स्पेनने स्वित्झर्लंडचा ३-१ असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
गोलरक्षक उनाय सिमॉन स्पेनच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने पेनल्टी-शूटआऊटमध्ये दोन गोल वाचवत स्पेनला युरो चषकाचे चौथे जेतेपद पटकावण्याच्या जवळ आणून ठेवले आहे. निर्धारित वेळेत डेनिस झकारियाच्या स्वयंगोलमुळे स्पेनला आघाडी मिळाली होती. त्यानंतर झेरदान शाकिरीने ६८व्या मिनिटाला स्वित्झर्लंडला बरोबरी साधून दिली होती.
उपउपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियावर ५-३ असा अतिरिक्त वेळेत विजय मिळवल्यानंतर स्पेनचा आत्मविश्वास काहीसा दुणावला होता. याचाच फायदा उठवत स्पेनने सुरुवातीपासूनच स्वित्झर्लंडविरुद्ध हल्ले चढवले. आठव्या मिनिटाला कोकेने टोलवलेला चेंडू स्वित्झर्लंडच्या गोलक्षेत्रात येऊन धडकल्यानंतर जॉर्डी अल्बाने तो गोलजाळ्यात धाडण्याचा प्रयत्न केला. पण स्वित्झर्लंडचा मध्यरक्षक डेनिस झकारिया याने तो बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला असताना चेंडू गोलरक्षक यान सोम्मेरला चकवून गोलजाळ्यात गेला.
अखेर ६८व्या मिनिटाला शाकिरीने स्वित्झर्लंडला बरोबरी साधून दिली. मिळालेल्या संधीवर शाकिरीने लॅपोर्टे आणि पाऊ टोरेस यांचा बचाव भेदत चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवली.