पेनल्टी शूटआऊटमध्ये रेंजर्सवर मात; गोलरक्षक ट्रॅप चमकला

वृत्तसंस्था, सेव्हिल : नियमित वेळ आणि अतिरिक्त वेळेतील १-१ अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये रेंजर्सवर ४-५ अशा फरकाने मात करत जर्मन संघ एनट्रॅक फ्रँकफर्टने ‘युएफा’ युरोपा लीग फुटबॉलचे जेतेपद पटकावले. स्पेनमधील सेव्हिल येथे झालेला अंतिम सामना सुरुवातीपासून चुरशीचा झाला. पूर्वार्धात दोन्ही संघांच्या बचाव फळींनी चांगला खेळ केला. त्यामुळे मध्यंतराला सामन्यात गोलशून्य बरोबरी होती. उत्तरार्धात फ्रँकफर्टने अधिक आक्रमक खेळ केला. मात्र, स्कॉटिश संघ रेंजर्सने प्रतिहल्ला केला आणि ५७व्या मिनिटाला जो अरिबोने केलेल्या गोलमुळे त्यांना १-० अशी आघाडी मिळाली. मात्र, ही आघाडी फार काळ टिकली नाही. ६९व्या मिनिटाला आघाडीपटू राफाएल बोरेने गोल करत फ्रँकफर्टला बरोबरी साधून दिली. नियमित ९० मिनिटांच्या खेळानंतर ही बरोबरी कायम राहिल्याने ३० मिनिटांचा अतिरिक्त वेळ झाला. मात्र, त्यातही दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी ठरले. मग बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला.

शूटआऊटमध्ये फ्रँकफर्टने पाचही पेनल्टी अचूक मारल्या. रेंजर्सच्या चार खेळाडूंना चेंडू गोलजाळय़ात मारण्यात यश आले. परंतु अनुभवी मध्यरक्षक आरोन रामसीने मारलेला फटका फ्रँकफर्टचा गोलरक्षक केव्हिन ट्रॅपने अडवला. त्यामुळे फ्रँकफर्टने तब्बल ४२ वर्षांनंतर एखादी युरोपीय स्पर्धा जिंकली. तसेच या विजयामुळे फ्रँकफर्टचा संघ पुढील हंगामातील चॅम्पियन्स लीगसाठी पात्र ठरला आहे.

फ्रँकफर्टचा गोलरक्षक ट्रॅपने या सामन्यात उत्कृष्ट खेळ केला. त्याने अतिरिक्त वेळेच्या अखेरच्या काही मिनिटांत आधी रेंजर्सचा आघाडीपटू रायन केंटने मारलेला फटका पायाच्या साहाय्याने अप्रतिमरीत्या अडवला. तसेच रेंजर्सचा कर्णधार जेम्स टावेर्निएरने मारलेली फ्री-किकही अडवली. त्यामुळे त्याला अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला.

पेनल्टी शूटआऊट

     रेंजर्स          फ्रँकफर्ट           

जेम्स टावेर्निएर 4  (१-१)  ख्रिस्तोफर लेंझ 4

स्टिव्हन डेव्हिस 4  (२-२)  एडिन रूस्टिक 4

स्कॉट आर्टफिल्ड 4 (३-३)  डाइची कमाडा 4

आरोन रामसी ७ (३-४)  फिलिप कॉस्टिच 4

केमार रूफे 4  (४-५)  राफाएल बोरे 4