scorecardresearch

युरोपा लीग फुटबॉल : पराभवानंतरही मँचेस्टर युनायटेड अंतिम फेरीत

पहिल्या टप्प्यातील सामन्यात व्हिलारेयालने २-१ असा विजय मिळवला होता.

युरोपा लीग फुटबॉल : पराभवानंतरही मँचेस्टर युनायटेड अंतिम फेरीत
एडिन्सन कव्हानी

उपांत्य लढतीत एकूण गोलफरकाच्या बळावर रोमावर सरशी; आर्सेनलचेही आव्हान संपुष्टात

युरोपा लीग फुटबॉलमध्ये गुरुवारी मध्यरात्री झालेल्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या टप्प्यातील लढतीत रोमाने मँचेस्टर युनायटेडवर ३-२ अशी मात केली, परंतु त्यानंतरही ८-५ अशा एकूण गोलफरकाच्या बळावर मँचेस्टर युनायटेडने अंतिम फेरीतील स्थान पक्के केले. अन्य सामन्यात व्हिलारेयालने बलाढ्य आर्सेनलवर एकूण गोलफरकामुळे २-१ असा विजय मिळवून प्रथमच अंतिम फेरी गाठली.
गेल्या आठवड्यात युनायटेडने घरच्या मैदानावर खेळताना रोमाचा पहिल्या टप्प्यातील उपांत्य सामन्यात ६-२ असा धुव्वा उडवला. त्यामुळे या लढतीत विजय मिळवण्यासाठी रोमाला ५-० अशा फरकाने सामना जिंकणे अनिवार्य होते. एडिन झेको (५७वे मिनिट), ब्रायन क्रिस्टेन (६०) आणि अ‍ॅलेक्स टेल्स (स्वयंगोल ८३) यांनी रोमासाठी तीन गोल केले, परंतु युनायटेडसाठी एडिन्सन कव्हानीने ३९ आणि ६८व्या मिनिटाला दोन गोल नोंदवून रोमाच्या पुनरागमनाच्या आशांना धुडकावून लावले. गोलरक्षक डेव्हिड डी गियानेसुद्धा रोमाच्या आक्रमणाला अनेकदा थोपवून धरले. आता २७ मे रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत युनायटेडसमोर व्हिलारेयालचे आव्हान असेल.
दुसऱ्या उपांत्य लढतीत व्हिलारेयालने आर्सेनलला गोलशून्य बरोबरीत रोखले, परंतु पहिल्या टप्प्यातील सामन्यात व्हिलारेयालने २-१ असा विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांनी आर्सेनलचेच माजी प्रशिक्षक युनाई एमेरी यांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम फेरीतील स्थान पक्के केले.
४ मँचेस्टर युनायटेडने चार वर्षांनी प्रथमच एखाद्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. २०१७ मध्ये त्यांनी आयएक्सला नमवून युरोपा लीगचेच अखेरचे जेतेपद मिळवले होते.
१५ मँचेस्टर युनायटेडच्या एडिन्सन कव्हानीने गेल्या १० सामन्यांत १५ गोल केले असून एखाद्या स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या दोन्ही टप्प्यांतील लढतींमध्ये किमान दोन गोल करणारा तो विश्वातील दुसराच फुटबॉलपटू ठरला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-05-2021 at 02:18 IST

संबंधित बातम्या