आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा(आयसीसी) यंदाच्या वर्षाचा सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार प्राप्त अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विन याने भारताचा कर्णधार विराट कोहलीचे कौतुक करताना जगातील कोणतीच धावसंख्या कोहलीला रोखू शकत नाही, असे म्हटले. भारतीय संघाला विजयासाठी ४०० धावांची गरज असली आणि विराटने ठरवले तर तेही लक्ष्य तो सहज गाठू शकेल, असे अश्विन ‘क्रिकबझ’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

विराट कोहलीच्या आत्मविश्वसाची तुलना करताच येऊ शकत नाही. तो खेळपट्टीवर मोठ्या आत्मविश्वसाने खेळतो. संघासमोर कितीही मोठे आव्हान असेल की तो काळजी करण्याचे काहीच कारण नाही, मी धावा करेन असे म्हणून कमालीचा आत्मविश्वास वाढवतो आणि तितक्याच आत्मविश्वसाने मैदानात खेळून संघाला विजय प्राप्त करून देतो. त्याच्यासमोर कोणतेही आव्हान ठेंगणे आहे, असे अश्विनने सांगितले.
आर.अश्विनने यावेळी आपल्या उमेदीच्या काळातील क्षणांवर देखील प्रकाशझोत टाकला. क्रिकेटमध्ये आपले करिअर घडवू शकेन असा सुरुवातीला आत्मविश्वास नव्हता. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले असल्याने अभ्यासाकडेही ओढ होती. त्यामुळे निवड करणे खूप कठीण जात होते. अखेर मी क्रिकेटचीच निवड केली आणि आज मला त्याचा अभिमान आहे, असे अश्विन म्हणाला.

इंजिनिअरिंगच्या दुसऱया वर्षात मी क्रिकेटला जास्त महत्त्व देण्याचे ठरवले. कारण, मला इंजिनिअरिंगपेक्षा क्रिकेटवर जास्त प्रेम होते. इंजिनिअरिंग माझ्यासाठी दिवसेंदिवस कठीण होत चालले होते. कॉलेजचे शिक्षक, मुख्याध्यापकांनी माझा खेळ पाहून क्रिकेटमध्ये करिअर करण्याचे वारंवार सल्ले देण्यास सुरूवात केली. क्रिकेटमधून तू खूप पैसा कमावू शकतोस, मग इंजिनिअरिंग का करतोस?असेही मला सांगण्यात आले. त्यामुळे मनातील इच्छा आणि इतरांनी दिलेला सल्ला ऐकून मी पूर्णवेळ क्रिकेटकडे लक्ष देण्यास सुरूवात केली. त्यामुळे माझ्या करिअरमध्ये मला पाठिंबा देणाऱयांचाही तितकाच हातभार आहे, असे अश्विन म्हणाला.