वेस्ट इंडिजविरुद्ध १०२ धावांनी दणदणीत विजय मिळवून तूर्तास तरी भारतीय संघाने तिरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पध्रेतील आव्हान टिकवले आहे. कप्तान विराट कोहलीच्या शानदार शतकामुळे भारताला हा विजय साकारता आला.
कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमधील १४वे शतक साजरे केल्यामुळे भारताला ७ बाद ३११ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. त्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुइस नियमानुसार, वेस्ट इंडिजपुढे विजयासाठी ३९ षटकांत २७४ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. परंतु विंडीजचा डाव फक्त ३४ षटकांत १७१ धावांत भारतीय गोलंदाजांनी गुंडाळून एका बोनस गुणाची कमाईसुद्धा केली. पहिल्या दोन सामन्यांतील पराभवांनंतर कॅरेबियन बेटांवर भारतीय संघाने आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
      कर्णधार म्हणून हा माझा दुसरा सामना होता आणि माझे शतक साजरे झाले. वैयक्तिक शतकापेक्षाही भारताला बोनस गुणासहित विजय मिळवता आला, याचा मला अतिशय आनंद झाला आहे!
– विराट कोहली,
भारताचा कर्णधार