लुकाकूची हॅट्ट्रिक; एव्हर्टन विजयी

पहिल्या सत्रात दोन्ही संघांकडून तोडीस तोड खेळ झाला.

 

रोमेलू लुकाकूने ११ सामन्यांतील गोलदुष्काळ थाटात संपवताना ११ मिनिटांत हॅट्ट्रिक नोंदवत एव्हर्टनला इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये संदरलँडवर ३-० असा विजय मिळवून दिला. बेल्जियमच्या लुकाकूने ६० व ६८व्या मिनिटाला हेडरद्वारे गोल केला आणि ७१व्या मिनिटाला आणखी एक गोल करून हॅट्ट्रिक पूर्ण केली. या विजयाबरोबर एव्हर्टनने (१०)  तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.

पहिल्या सत्रात दोन्ही संघांकडून तोडीस तोड खेळ झाला. दोघांनाही गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले. मध्यंतरानंतर सामन्यातील चुरस अधिक वाढली. घरच्या प्रेक्षकांसमोर विजयासाठी प्रयत्नशील असलेल्या संदरलँडचे आक्रमण एव्हर्टनचा गोलरक्षक मार्टेन स्टेकेनबर्गने थोपवले. ६०व्या मिनिटाला लुकाकूने एव्हर्टनच्या चमूत आनंद निर्माण केला. गॅना ग्युऐच्या पासवर लुकाकूने हेडरद्वारे गोल करून अकरा सामन्यांतील दुष्काळ संपवला. या गोलमुळे प्रेरित झालेल्या लुकाकूने गोलसपाटा लावला. बोलासिया यालाच्या पासवर ६८व्या मिनिटाला हेडरद्वारे, तर केव्हिन मिरालासच्या पासवर ७१व्या मिनिटाला गोल करून लुकाकूने  विजय निश्चित केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Everton win in english premier league