इंडोनेशियातील जकार्ता येथे पार पडणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी अखिल भारतीय कबड्डी महासंघाने नुकतीच भारतीय संघाची घोषणा केली. ४२ जणांच्या संभाव्य संघात माजी कर्णधार अनुप कुमार आणि अनुभवी खेळाडू मनजीत छिल्लर यांना जागा देण्यात आलेली नाहीये. महासंघाच्या या निर्णयानंतर अनेक कब़ड्डीप्रेमींनी याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं होतं. मात्र एका खासगी इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार अजय ठाकूरने, अनुप आणि मनजीतला वगळण्याचा निर्णय एका अर्थाने योग्यच असल्याचं बोलून दाखवलं आहे.

अवश्य वाचा – आशियाई खेळांसाठी भारताच्या संभाव्य कबड्डी संघाची घोषणा, अनुप कुमारला वगळलं 

एका ठराविक वेळेनंतर संघातल्या सिनीअर खेळाडूंनी नवोदीतांना संधी देणं यात काहीच वावग नाही. अनुप आणि मनजीत छिल्लरला संघात जागा मिळाली नाही, यावरुन कोणाच्याही मनात शंका निर्माण व्हायला नको. प्रत्येक खेळामध्ये असं होतच असतं, कोणता न कोणता खेळाडू सिनीअर खेळाडूची जागा घेतो. अनुप आणि मनजीतला संघातून वगळण्याच्या निर्णयावर अजयने आपलं मत व्यक्त केलं. “आज ज्याप्रमाणे अनुप-मनजीतला संघाबाहेर जावं लागतंय, उद्या तीच वेळ आमच्यावरही येणार आहे. एखादा चांगला तरुण खेळाडू संघात आल्यानंतर आम्हालाही जागा रिकामी करुन द्यावी लागणार आहे. एका ठराविक वयानंतर सचिन तेंडुलकरनेही क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला योग्य वेळी थांबता येणंही गरजेचं आहे”.

प्रो-कबड्डीतील यू मुम्बा संघाचे प्रशिक्षक एदुचरी भास्करन यांनीही अजय ठाकूरच्या मताला आपली सहमती दर्शवली. “अनुप आणि मनजीत अजुनही निवृत्त झाले नसले तरीही त्यांना एखाद्या दिवशी निवृत्त व्हावं लागणार आहे. त्यामुळे जो खेळाडू चांगली कामगिरी करेल त्याला संघात अवश्य जागा मिळेल.” कोणत्याही खेळाडूचं भारतीय संघातलं स्थान निश्चीत नसल्याचंही भास्करन यांनी आवर्जून नमूद केलं.

आशियाई खेळांसाठी भारताचा संभाव्य संघ पुढीलप्रमाणे –

मनोज कुमार, प्रवेश, अमित नागर, दर्शन, आशिष सांगवान, संदीप नरवाल, सुरेंदर नाडा, अजय ठाकूर, विशाल भारद्वाज, मोहीत छिल्लर, राजेश मोंडल, विकाश कंडोला, नितेश बी.आर., प्रपंजन, प्रशांत राय, सुकेश हेगडे, गिरीश एर्नाक, निलेश साळुंखे, रिशांक देवाडीगा, सचिन शिंगाडे, विकास काळे, महेश गौड, मनोज, मणिंदर सिंह, दिपक निवास हुडा, कमल, राजुलाल चौधरी, सचिन तवंर, वझीर सिंह, जयदीप, मोनू गोयत, नितेश, नितीन तोमर, रोहित कुमार, सुरजीत, सुरजीत सिंह, रणजीत चंद्रन, गंगाधर, अभिषेक सिंह, राहुल चौधरी, नितीन रावल आणि प्रदीप नरवाल