मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर संघनिवडीचा पेच निर्माण झाला आहे. कर्णधार विराट कोहलीचे पुनरागमन आणि श्रेयस अय्यरचे नेत्रदीपक पदार्पण यामुळे धावांसाठी झगडणाऱ्या अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि सलामीवीर मयांक अगरवाल यांच्यापैकी एकाला वगळण्याची शक्यता आहे; परंतु रहाणे-पुजाराच्या कामगिरीची कोणतीही चर्चा झाली नसून, संघ त्यांच्या पाठीशी आहे, असे स्पष्टीकरण गोलंदाजीचे प्रशिक्षक पारस म्हांब्रे दिले आहे.

ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर विश्रांती घेऊन ताजातवाना झालेला कोहलीसुद्धा दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध झाला आहे. कानपूरला झालेल्या पहिल्या कसोटीत मुंबईकर श्रेयसने पदार्पणात शतकाचा पराक्रम दाखवताना पहिल्या डावात १०५ आणि दुसऱ्या डावात ६५ धावा केल्या. त्यामुळे संघरचनेचे कोडे संघ व्यवस्थापनापुढे पडले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचे नेतृत्व करणारा रहाणे धावांसाठी झगडत आहे. गेल्या १६ कसोटी सामन्यांतील त्याची धावांची सरासरी २४.३९ आहे. वर्षांआधी बॉक्सिंग डे कसोटीत त्याने अखेरचे शतक नोंदवले होत़े  कानपूर कसोटीत रहाणेने दोन डावांत अनुक्रमे ३५ आणि ४ धावा केल्या होत्या. पुजारासुद्धा मोठी खेळी उभारण्यात सातत्याने अपयशी ठरत आहे. तीन वर्षांपूर्वी त्याने शेवटचे शतक साकारले होते. गेल्या २३ सामन्यांमधील त्याची धावांची सरासरी २८.६१ इतकी आहे. या तुलनेत मयांकने १५ कसोटी सामन्यांत ४३.२८ धावसरासरी राखली आहे. पहिल्या कसोटीत त्याने दोन डावांत १३ व १७ धावा काढल्या होत्या. परंतु दोन वरिष्ठ खेळाडूंसाठी मयांकला वगळणे अयोग्य ठरेल.

‘‘रहाणे-पुजाराकडे कसोटी क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे सूर गवसण्यापासून ते एका डावाच्या अंतरावर आहेत. संघ म्हणून आम्ही सर्व जण दोघांच्या पाठीशी आहोत. ते पुरेसे क्रिकेट खेळले असल्यामुळे त्यांना अपेक्षांची जाणीव आहे,’’ अशा शब्दांत म्हांब्रे यांनी दोघांचे समर्थन केले.

संघनिवडीच्या पेचाबाबत म्हांब्रे म्हणाले, ‘‘ही समस्या उत्तम आहे, असे मला वाटते. भारतीय क्रिकेटमधील गुणवत्तेवर बोलण्यासारखे खूप आहे. उदयोन्मुख युवा खेळाडूंना योग्य संधी मिळायला हवी. श्रेयससारखा फलंदाज पदार्पणातच शतक आणि अर्धशतकासह लक्ष वेधतो; परंतु सामन्याच्या खेळपट्टीनुसार संघरचना करावी लागते.’’

साहाचा निर्णय सामन्याआधी

यष्टिरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाच्या खेळण्याबाबतचा निर्णय सामन्याआधी घेऊ, असे म्हांब्रे यांनी सांगितले. ‘‘फिजिओकडून मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार विराट कोहली सातत्याने साहाच्या तंदुरुस्तीचा आढावा घेत आहेत,’’ असे म्हांब्रे यांनी म्हटले आहे. कानपूर कसोटीच्या दुसऱ्या डावात साहाने नाबाद ६१ धावांची झुंजार खेळी साकारली होती; परंतु मान दुखावल्याने पाचव्या दिवशी तो यष्टिरक्षणासाठी मैदानावर उतरू शकला नाही. त्याच्याऐवजी के. एस. भरतने यष्टिरक्षण केले.

इशांतला सूर गवसेल!

वेगवान गोलंदाज इशांत शर्माला पुढील दोन सामन्यांत योग्य सूर गवसेल, अशी आशा म्हांब्रे यांनी व्यक्त केली. १००हून अधिक कसोटी सामन्यांचा अनुभव गाठीशी असलेल्या इशांतला इंग्लंड दौऱ्यावर अपेक्षित यश मिळाले नाही. कानपूरमध्ये त्याला एकसुद्धा बळी मिळवता आला नव्हता.

एकदिवसीय क्रिकेटमधीलही कोहलीचे कर्णधारपद धोक्यात?

मुंबई : विराट कोहलीच्या भारताच्या एकदिवसीय संघाच्या नेतृत्वाबद्दलचे भवितव्य येत्या आठवडय़ात स्पष्ट होऊ शकते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी पुढील काही दिवसांत चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समिती भारताचा संघ निवडणार आहे. कोहलीने ट्वेन्टी—२० संघाचे कर्णधारपद सोडले असून पुढील सात महिन्यांत भारताला नऊ एकदिवसीय सामने खेळावयाचे आहेत. २०२३च्या विश्वचषकाचा विचार करता कोहली एकदिवसीय संघाच्या नेतृत्वपदाचाही राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

श्रेयस कसोटी क्रमवारीत ७४व्या स्थानी

दुबई : न्यूझीलंडविरूद्ध पदार्पणात १०५ आणि ६५ धावांची खेळी करत सामनावीराचा पुरस्कार पटकावणाऱ्या मुंबईकर श्रेयस अय्यरने ‘आयसीसी’ कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत प्रवेश मिळवला आहे. तो ७४व्या स्थानावर आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा हे अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर कायम आहेत. तसेच गोलंदाजांमध्ये भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला दुसरे स्थान राखण्यात यश आले. जसप्रीत बुमराची मात्र दहाव्या स्थानी घसरण झाली. फलंदाजांमध्ये इंग्लंडचा कर्णधार जो रूट (९०३ गुण) आणि गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (९०८ गुण) अव्वल स्थानी कायम आहेत.

मुंबईत फिरकीचा प्रभाव दाखवू – एजाझ

कानपूर कसोटीमध्ये आम्ही अपेक्षित कामगिरी करू शकलो नाही; परंतु मुंबईत फिरकीचा प्रभाव दाखवू, असा विश्वास न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज एजाझ पटेल याने व्यक्त केला. ‘‘कानपूरमध्ये अचूक टप्प्यावर आम्ही गोलंदाजी करण्यात अपयशी ठरलो किंवा भारतीय फलंदाजांनी आत्मविश्वासाने फिरकीचा प्रतिकार केला; परंतु मुंबईची खेळपट्टी वेगळी असेल. तिथे आम्ही कामगिरी उंचावू,’’ असे एजाझ म्हणाला.