नवी दिल्ली : वर्षभरात दुसऱ्यांदा मायदेशातील कसोटी मालिका गमावल्याने भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर टीकेची झोड उठली आहे. कसोटी संघासाठी नवा प्रशिक्षक नेमण्याची वेळ आल्याचे मत काही जाणकारांनी व्यक्त केले आहे. मात्र, भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर आणि माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांनी गंभीरची पाठराखण केली असून एकट्या प्रशिक्षकाला दोष देणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गंभीरच्या १६ महिन्यांच्या कार्यकाळात भारताने १९ पैकी १० कसोटी सामने गमावले असून केवळ सात सामने जिंकले आहेत. गंभीरची विजयाची टक्केवारी ३६.८२ अशी आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची ही आजवरची दुसरी सर्वांत सुमार कामगिरी ठरते.

‘‘गंभीर प्रशिक्षक आहे. संघाला तयार करणे हे प्रशिक्षकाचे काम असते. तो खेळाडूंना केवळ मार्गदर्शन करू शकतो, सल्ले देऊ शकतो. प्रत्यक्षात मैदानावर जाऊन योजनेची अंमलबजावणी करणे, सर्वोत्तम कामगिरी करणे हे काम खेळाडूंचे असते. त्यामुळे अपयशासाठी केवळ प्रशिक्षकाला कसे जबाबदार धरले जाऊ शकते?’’ असा प्रश्न गावस्कर यांनी उपस्थित केला.

‘‘गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारताने चॅम्पियन्स करंडक आणि आशिया चषक जिंकला, त्यावेळी त्याचा करार वाढवला पाहिजे, त्याला आजीवन करार दिला पाहिजे असे कोणी म्हटले का? मग आता संघ अपयशी ठरत असताना त्याची हकालपट्टी करण्याची मागणी का केली जाते? संघ चांगली कामगिरी करत नसेल, तेव्हाच प्रशिक्षकाबाबत चर्चा करणे, त्याला जबाबदार धरणे योग्य नाही,’’ असे रोखठोक मत गावस्कर यांनी व्यक्त केले.

त्याच वेळी गंभीरचा माजी सहकारी आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळलेल्या अश्विननेही त्याचे समर्थन केले. ‘‘आपण अशा प्रकारच्या चर्चा का करत आहोत? खेळ आहे, त्यात हार-जीत होतच राहणार. एखाद्या संघाला सांभाळणे सोपी गोष्ट नाही. मालिका गमावल्याचे गंभीरलाही खूप दु:ख झाले असेल. प्रशिक्षकाची हकालपट्टी करा, असे म्हणणे सोपे आहे.

मात्र, मला हे कधीही पटलेले नाही. गंभीर माझा नातेवाईक नाही. मी त्याच्या १० चुका दाखवू शकतो. मात्र, चुका प्रत्येकाकडूनच होतात हे विसरता कामा नये. तुम्ही एकट्या प्रशिक्षकाला जबाबदार धरू शकत नाही. प्रशिक्षक स्वत: बॅट घेऊन खेळायला जाऊ शकत नाही. खेळाडू आपले काम चोख करतील, तेव्हाच प्रशिक्षक यशस्वी ठरू शकतो,’’ असे अश्विन म्हणाला.

तुम्ही अपयशासाठी एकट्या प्रशिक्षकाला जबाबदार धरू शकत नाही. प्रशिक्षक स्वत: बॅट घेऊन खेळायला जाऊ शकत नाही. ते काम खेळाडूंचे आहे. खेळाडू आपले काम चोख करतील, तेव्हाच प्रशिक्षक यशस्वी ठरू शकतो. – रविचंद्रन अश्विन, माजी फिरकीपटू भारतीय संघाने चॅम्पियन्स करंडक आणि आशिया चषक जिंकला, तेव्हा गंभीरला फारसे श्रेय मिळाले नाही. मग आता भारतीय संघ अपयशी ठरत असताना त्याला एकट्याला का जबाबदार धरायचे? – सुनील गावस्कर, माजी कर्णधार