एपी, दोहा : विश्वविजेतेपदाचे स्वप्न साकार झाले असले, तरी आंतरराष्ट्रीय फुटबॉलला निरोप देण्याचा माझा विचार नाही. मी विश्वविजेता म्हणून आणखी काही सामने खेळण्यास उत्सुक आहे, असे म्हणत अर्जेटिनाचा कर्णधार आणि तारांकित आघाडीपटू लिओनेल मेसीने निवृत्तीच्या चर्चाना पूर्णविराम दिला.  

लुसेल स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात अर्जेटिनाने अतिरिक्त वेळेतील ३-३ अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सला ४-२ अशा फरकाने पराभूत करत तब्बल ३६ वर्षांच्या कालावधीनंतर विश्वचषकावर आपले नाव कोरले. ३५ वर्षीय मेसीचा हा विश्वचषकातील अखेरचा सामना होता आणि त्याने आपल्या विश्वचषकातील प्रवासाची विजयी सांगता केली. मेसीने या स्पर्धेत सात गोल केले. चार वर्षांनी होणाऱ्या पुढील विश्वचषकात मेसी खेळणार नसला, तरी त्याचा अर्जेटिनाकडून आणखी काही सामने खेळण्याचा मानस आहे.

new international cricket stadium in thane marathi news
ठाण्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान? ‘एमसीए’ची एकमेव निविदा दाखल
Mayank bowls the fastest ball in IPL 2024
LSG vs PBKS : बुमराह किंवा शमीला नव्हे, तर दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूला मयंक यादव मानतो आपला आदर्श
How MS Dhoni broke the news about Captaincy to Chennai Super Kings Management
Ms Dhoni Captaincy: पहाटेचा कॉल, ब्रेकफास्ट मीटिंग आणि धोनीने दिला धक्का…
Dead body of tiger in suspicious condition near international cricket stadium
नागपूर : आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमजवळ वाघाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह

‘‘विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद मिळवून मला माझी कारकीर्द परिपूर्ण करायची होती. मी याहून अधिक कशाची अपेक्षा करू शकत नाही. अशा पद्धतीने आपल्या कारकीर्दीची अखेर करणे निश्चितच समाधानकारक असेल. माझ्याकडे आता कोपा अमेरिका आणि विश्वचषकाचे जेतेपद आहेत. मात्र, माझे फुटबॉलवरील प्रेम कमी झालेले नाही आणि राष्ट्रीय संघाकडून खेळताना मला नेहमीच आनंद मिळतो. जगज्जेत्या संघासह आणखी काही सामने खेळण्याची माझी इच्छा आहे,’’ असे मेसी म्हणाला.

मेसीने सात वेळा जगातील सर्वोत्तम खेळाडूचा बॅलन’डी ओर पुरस्कार पटकावला आहे. तसेच त्याने बार्सिलोनाकडून खेळताना चार वेळा चॅम्पियन लीगचे जेतेपदही मिळवले आहे. आता अर्जेटिनाला विश्वचषक जिंकवून दिल्याने त्याने सर्वकालीन सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून ओळखले जाण्यासाठी आपली दावेदारी अधिक भक्कम केली आहे.

तसेच मेसीला खेळायचे असल्यास त्याची आपण संघात निवड करत राहू, असे अर्जेटिनाचे प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, ‘‘मेसीला पुढे खेळायचे असल्यास तो आमच्यासोबत राहू शकतो. त्याला खेळायचे आहे की नाही, हा सर्वस्वी त्याचा निर्णय आहे. तो माझ्या मार्गदर्शनाखाली खेळला याबाबत मी आनंदी आहे. त्याने संघाला जे काही दिले आहे, ते अतुलनीय आहे.’’

कतार विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक गोलचा विक्रम

अर्जेटिना आणि फ्रान्सदरम्यानच्या अंतिम सामन्यात सहा गोल झाल्यानंतर विश्वचषक फुटबॉल स्पर्धेमध्ये गोलचा नवीन विक्रम रचला गेला. कतारमध्ये खेळवण्यात आलेल्या विश्वचषक स्पर्धेत एकूण १७२ गोल झाले. १९९८ आणि २०१४च्या विश्वचषक स्पर्धेत एकूण १७१ गोल झाले होते. फ्रान्समध्ये १९९८च्या विश्वचषक स्पर्धेत ३२ संघांनी सहभाग नोंदवला होता आणि ६४ सामने झाले होते.

पेले यांच्याकडून मेसी, एम्बापेचे अभिनंदन 

ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांनी मेसीचे विश्वचषक जिंकण्यासाठी, तसेच फ्रान्सच्या किलियन एम्बापेचे अंतिम सामन्यात हॅट्ट्रिक ची नोंद केल्याबद्दल अभिनंदन केले आहे. पेले यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 मात्र, पेले यांनी इन्स्टाग्रामवर संदेश लिहित दोन्ही खेळाडूंचे कौतुक केले. ‘‘मेसीने आपले पहिले विश्वचषक जेतेपद मिळवले. त्याची कारकीर्द पाहता त्याला हे यश मिळालेच पाहिजे होते. माझा प्रिय मित्र एम्बापेने अंतिम सामन्यात चार गोल (पेनल्टी शूटआऊटच्या गोलसह) केले. खेळाच्या भविष्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. अर्जेटिनाचे अभिनंदन. डिएगो (मॅराडोना) आज खूप खुश असेल’’ पेले यांनी आपल्या संदेशात लिहिले.