इंग्लंडच्या बर्मिंगहॅम शहरामध्ये २२वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. लंडन आलिंपिकनंतरची ही इंग्लंडमधील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असल्याचे म्हटले गेले आहे. बर्मिंगहॅममधील अलेक्झांडर स्टेडियममध्ये २८ जुलैपासून सुरू झालेली ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. स्पर्धे दरम्यान काही वाईट घटना याठिकाणी घडल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेदरम्यान श्रीलंकेच्या चमूतील तीन खेळाडू बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे. यापैकी दोघांना शोधण्यात पोलिसांना यश आले. तर, एक श्रीलंकन ​​कुस्तीपटू अद्याप बेपत्ता आहे.

श्रीलंकेसाठी हा प्रसंग काही नवीन नाही. या देशाने अनेक वर्षांच्या देशांतर्गत अशांतता आणि गृहयुद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक खेळाडू बेपत्ता झाल्याचे बघितले आहे. यातील सर्वात कुप्रसिद्ध घटना २००४ मध्ये घडली होती. ‘मैत्रीपूर्ण खेळांसाठी’ जर्मनीला भेट दिलेला २३ सदस्यांचा श्रीलंकन ‘हँडबॉल संघ’ बेपत्ता झाला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे याबाबत श्रीलंकेच्या क्रीडा अधिकाऱ्यांनी आमच्याकडे असा संघच नव्हता, असा दावा केला होता.

Namo Maharojgar Melava
धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
Kapil Dev Says Some people will suffer but no one is bigger than the country
Kapil Dev : “काही लोकांना त्रास होईल, परंतु देशापेक्षा कोणीही…”, कपिल देव यांनी बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयाचे केले स्वागत
future players in indian cricket team
विश्लेषण : टीम इंडिया ‘जनरेशन नेक्स्ट’ कशी असेल?
team india kl rahul bcci
IND Vs ENG : केएल राहुल पाचव्या कसोटीलाही मुकणार, संघात दिग्गज खेळाडूचं पुनरागमन; अशी असेल टीम इंडिया

अशा घटना आपल्याला विचित्र वाटू शकतात. परंतु, प्रख्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधून खेळाडू बेपत्ता होण्याच्या प्रकाराला एक मोठा आणि नाट्यमय इतिहास आहे. खेळाडू बेपत्ता का होतात? याची कारणीमीमांसा या ठिकाणी करण्यात आली आहे.

हेही वाचा – CWG 2022: पंतप्रधान मोदींची ‘ती’ कृती पाहून पाकिस्तानी पत्रकार भारावला; म्हणाले “आमच्या पंतप्रधानांना तर…”

का होतात खेळाडू बेपत्ता ?

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा हे फक्त एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आहे, जिथे शेकडो देशांतील खेळाडूंना स्पर्धा करण्याची संधी मिळते. महत्त्वाचे म्हणजे मायदेशापासून दूर प्रवास करण्याची संधी या निमित्त मिळते. सामान्यत: राजकीय संकट किंवा अस्थिर आर्थिक परिस्थिती असलेल्या देशांतील खेळाडू अशा स्पर्धांच्या ठिकाणांहून बेपत्ता होतात किंवा पळून जातात. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात अशा अनेक घटना घडल्या आहेत.

यूकेसारखे देश सहभागी खेळाडू आणि अधिकाऱ्यांना स्पर्धा संपल्यानंतर काही महिन्यांसाठी व्हिसा देतात. पण, अनेकदा खेळाडूंचे पासपोर्ट आणि महत्त्वाची कागदपत्रे त्यांचे प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापकांकडे असतात. असे असूनही काही खेळाडू चांगल्या राहणीमानाच्या संधीसाठी यजमान देशात राहतात.

हेही वाचा – Photos: हरमनप्रीत कौर ते स्मृती मंधाना…’या’ आहेत भारताच्या रौप्य पदकाच्या शिल्पकार

कॅमेरूनमधील धावपटू लॅमिन टकरसारखे काही खेळाडू २००६च्या राष्ट्रकुल खेळांनंतर ऑस्ट्रेलियात गेले होते. तिथे त्यांना काही काळ आश्रय देण्यात आला आहे. त्यांना हद्दपार होण्यापासून संरक्षण देण्यात आले आहे. कारण, त्यांना आपल्या देशात उपलब्ध असलेल्या क्रीडा सुविधांबद्दल प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य मिळालेले नाही. अशा परिस्थितीत त्यांनी दुसऱ्या देशाचा आसरा घेतला आहे. २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून किमान १३ आफ्रिकन खेळाडू बेपत्ता झाले होते. त्यावेळी बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार. त्यापैकी बहुतेक खेळाडू कॅमेरूनचे होते.

इतर बेपत्ता खेळाडू युगांडा, सिएरा लिओन आणि रवांडा येथील होते. काहीवेळा, नियुक्त प्रशिक्षक आणि इतर कर्मचारी देखील पळून जातात. उदाहरण घ्यायचे झाल्यास, २००६च्या मेलबर्नमधील राष्ट्रकुल खेळांचे घेता येईल. हस्तांतरणाचे अतिशय कठोर कायदे असलेल्या ऑस्ट्रेलियात ४० हून अधिक खेळाडू आणि अधिकारी बेपत्ता झाले होते. तर, काहींनी रितसर आश्रय मागितला होता.

ऑलिंपिकमधूनही खेळाडू होतात बेपत्ता

ऑलिंपिकमध्ये खेळाडू बेपत्ता होण्याच्या घटनांचे प्रमाण जास्त आहे. अशा खेळाडूंना ‘ऑलिंपिक डिफेक्टर्स’ म्हणून संबोधले जाते. खेळांच्या आधुनिक इतिहासाचा आढावा घेतल्यास खेळाडू बेपत्ता होण्याची सुरुवातीची प्रकरणे शीतयुद्धाच्या काळातील होती. त्यावेळी कम्युनिस्ट देशांतील खेळाडूंनी पाश्चात्य राष्ट्रांमध्ये आश्रय घेतला होता. २००२मध्ये गार्डियनने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात, बेपत्ता झालेल्या खेळाडूंच्या इतिहासाचे तपशीलवार वर्णन केलेले आहे. शीतयुद्धाच्या काळात अशा प्रकारच्या युक्त्या या राजकीय फायद्यासाठी अनेकदा वापरल्या गेल्याचे दिसून आले आहे. पण, सध्याच्या काळाचा विचार करता, श्रीमंत देश स्थलांतरित खेळाडूंनांही आश्रय देण्यासाठी फारसे उत्सुक नसतात.

१९५६मध्ये मेलबर्न येथील ऑलिंपिक स्पर्धा अशा वेळी आयोजित करण्यात आली होती, जेव्हा युएसएसआरने हंगेरीमधील उठाव रोखण्यासाठी बळाचा वापर केला होता. द वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, हंगेरियन ऑलिंपिक संघाने मेलबर्नमध्ये उतरल्यानंतर ही बातमी ऐकली आणि अनेकांनी देशात परत न जाण्याचा विचार पक्का केला. स्पर्धा सुरू असतानाही, हंगेरी आणि सोव्हिएत युनियनमधील वॉटर पोलो उपांत्य सामना ओंगळवाणा ठरला. अनेक हंगेरियन खेळाडू रक्ताळलेले तोंड घेऊन पूलमधून बाहेर पडल्याचे फोटो समोर आले होते. या स्पर्धेनंतर अनेक खेळाडूंनी अमेरिकेचा आश्रय घेतला होता.

हेही वाचा – Commonwealth Games 2022: सुवर्ण-रौप्य पदक खरंच सोने आणि चांदीचे असतात का? जाणून घ्या, मेडल्स बनवण्यामागची गोष्ट

यूकेमध्ये थांबलेल्या सिएरा लिओनमधील एका खेळाडूने गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, त्याच्या निर्णयाला विविध घटक कारणीभूत आहेत. “अॅथलीट वर्षानुवर्षे कठीण परिस्थितीत स्पर्धेची तयारी करत होते. भारोत्तोलकांनी काँक्रीटने आच्छादलेले कारचे टायर उचलून प्रशिक्षण घेतले होते. देशासाठी कष्ट घेऊनही त्यांच्याकडे पैसे नव्हते. उद्घाटनासाठी त्यांना दुकानातून विकत घेतलेले रेनकोट घालावे लागले होते.”

थांबावे की परत जावे? खेळाडूंची द्विधा मनस्थिती

काही क्रीडापटू नवीन देशात कायमस्वरूपी स्थायिक होतात, नोकरी करतात आणि पैसे घरी परत पाठवतात. तर, काहीजण नवीन ठिकाण आणि परिस्थितीशी जुवळवून न घेता आल्याने थोड्या दिवसांनी आपल्या मायदेशात परत जातात. एरिट्रियामधील १८ वर्षीय खेळाडू वेने गेब्रेसिलसीने यूकेमध्ये आश्रयासाठी अर्ज केला होता. द ​​गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “मला अजूनही माझ्या देशावर खूप प्रेम आहे. मात्र, कठोर परिस्थिती आणि मूलभूत मानवी हक्कांच्या कमतरतेमुळे मला परदेशात आश्रय घेणे भाग पाडले”.

वरील विविध कारणांमुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी बाहेरच्या देशात गेलेले खेळाडू बेपत्ता होतात किंवा ते मायदेशी परत जात नाहीत.