India CWG 2022 Performance: नुकतीच इंग्लंडमधील बर्मिंगहॅम शहरातील अलेक्झांडर स्टेडियमवर २२वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा खेळवली गेली. यावर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण ६१ पदके जिंकून पदकतालिकेत चौथे स्थान मिळवले. यामध्ये २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य पदकांचा समावेश आहे. टोकियो ऑलिंपिकमधील यशानंतर भारतीय खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धेतही आपल्या देशाचा गौरव वाढवला.

टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताने सात पदकांची कमाई केली होती. त्यामुळे साहजिकच राष्ट्रकुल स्पर्धेत अपेक्षा वाढलेल्या होत्या. मात्र, नेमबाजीची अनुपस्थिती भारताला संकटात टाकेल की काय? अशीही धाकधूक क्रीडा प्रेमींच्या मनात होती. २०१८मध्ये झालेल्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारताने १६ पदकांची कमाई केली होती. याशिवाय, तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्रा हा उद्घाटन सोहळ्याच्या दोन दिवस आधी मांडीच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला. त्यामुळे भारतात या खेळांसाठीचा उत्साह किंचितसा कमी झाला होता. मात्र, इतर खेळाडूंनी कशाचीही पर्वा न करता आपल्या सर्वोत्तम खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या लौकिकाला साजेशी अशी पदकांची कमाई केली.

बर्मिंगहॅमला गेलेल्या भारतीय तुकडीने अप्रतिम कामगिरी केली. कुस्तीपटू, बॉक्सर, वेटलिफ्टिंगपटू, बॅडमिंटनपटू, ज्युदोपटू, ट्रॅक आणि फील्ड खेळाडू, लॉन बॉल्स पुरुष आणि महिला संघ, आणि महिला क्रिकेट संघ ज्यांनी आपला खेळ उंचावला आणि भारतासाठी २२ सुवर्णांसह ६१ पदकांची कमाई केली. ऐनवेळी जखमी होऊन महाराष्ट्राच्या मातीतील खेळाडू असलेल्या संकेत सरगरने माघार न घेता रौप्य पदक मिळवले. मीराबाई चानूने आपल्या अनुभवाचा कस लावून सुवर्णपदक पटकावले. तिच्या कामगिरीमुळे वेटलिफ्टिंग चमूमध्ये उत्साह संचारला असेल, यात शंका नाही.

ज्युदोपटूंनी आणि लॉन बॉल्स खेळाडूंनी भारताला अनपेक्षित पदकांची भेट दिली. सुशिला लिकामाब, तुलिका मानने रौप्य आणि विजय कुमारने कांस्य पदक मिळवून आश्चर्याचा सुखद धक्का दिला. त्यानंतर महिला लॉन बॉल संघाने ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावून जल्लोषासाठी आणखी एक कारण मिळवून दिले. पुरुष लॉनबॉल संघानेही आपल्या सहकाऱ्यांचा पावलावर पाऊल टाकून पदक मिळवले. भालाफेकीमध्ये अनु राणीने पदक पटकावून नीरज चोप्राची कमी काही प्रमाणात भरून काढली.

अॅथलेटिक्समध्ये यावर्षी भारतीय खेळाडूंनी जीवतोड मेहनत केल्याचे दिसले. तेजस्वीन शंकरने भारताला अॅथलेटिक्समध्ये पहिले पदक मिळवून दिले. खेळापूर्वी त्याला सहन कराव्या लागलेल्या सर्व त्रासांनंतर त्याच्या कांस्यपदकाला सोन्याइतकेच महत्त्व होते. मुरली श्रीशंकरने लांब उडी स्पर्धेत रौप्यपदक जिंकून चांगली कामगिरी केली. चालण्याच्या शर्यतीमध्ये प्रियंका गोस्वामीने रुपेरी कामगिरी केली. तिहेरी उडीमध्ये एल्डोस पॉल आणि अब्दुल्ला अबूबकर या दोन खेळाडूंनी अभूतपूर्व कामगिरी करून सुवर्ण आणि रौप्यपदक मिळवले. मात्र, सर्वात जास्त चर्चा झाली ती महाराष्ट्रीय खेळाडू अविनाश साबळे याची. त्याने अडथळ्यांच्या (स्टीपलचेस) शर्यतीत रौप्य पदक पटकावून केनियन खेळाडूंची मक्तेदारी मोडून काढण्याची कामगिरी केली.

हेही वाचा – डेव्हिड वॉर्नर झाला पीव्ही सिंधूचा ‘फॅन’; खास पोस्ट करून म्हणाला…

भारतीय कुस्तीपटूंनी तर कमलाच केली. बर्मिंगहॅमला गेलेल्या सर्व १२ कुस्तीपटूंनी पदके जिंकली आहेत. रवी दहिया, बजरंग पुनिया, दीपक पुनिया, विनेश फोगट, नवीन सिहाग आणि साक्षी मलिकने सुवर्ण, तर अंशू मलिकने रौप्यपदक जिंकले. पूजा गेहलोत, पूजा सिहाग, दीपक नेहरा, दिव्या काकरन आणि मोहित ग्रेवाल हे कांस्यपदकांचे मानकरी ठरले. बॉक्सिंग चमूनेही कंबर कसत पदकांची लयलटू केली. नितू घांगघस, अमित पंघाल आणि निखत जरीन यांनी प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडून सोने मिळवले. सागर अहलावतला बॉक्सिंगमध्ये चौथ्या सुवर्णपदकाची भर घालता आली नाही. त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मोहम्मद हुसामुद्दीन, जैस्मिन लॅम्बोरिया आणि रोहित टोकस यांनी कांस्यपदक मिळवले.

टेबल टेनिस खेळाडूंनी यावर्षी चमकदार कामगिरी केली. पुरुष सांघिक टेबल टेनिस संघातील जी साथियान आणि हरमीत देसाई यांनी सुवर्णपदक जिंकले. ४० वर्षीय अचिंता शरथ कमलने तर ‘एज इज जस्ट अ नंबर’ ही उक्ती सिद्ध केली. त्याने तीन सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकले. राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदाच क्रिकेट खेळणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाने रौप्यपदक मिळवले. हॉकीमध्ये पुरुष आणि महिला संघाने एक-एक पदक आणून पदकांच्या संख्येत भर घातली.

हेही वाचा – Asia Cup 2022: आशिया चषकाबाबत ‘या’ रंजक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा शेवटचा दिवस भारताच्या बॅडमिंटनपटूंनी गाजवला. पीव्ही सिंधूने महिला एकेरीच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक पटकावले. डाव्या घोट्याला दुखापत असूनही केवळ ४८ मिनिटांत सरळ गेममध्ये तिने विजय मिळवला. त्यानंतर आपली पहिलीच राष्ट्रकुल स्पर्धा खेळत असलेल्या लक्ष्य सेनने मलेशियाच्या प्रतिस्पर्ध्यावर खणखणीत विजय मिळवत देशाला आणखी एक सुवर्ण मिळवून दिले. दिवसाच्या अखेरीस सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीत बॅडमिंटनमधील तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले.

वरील सर्व खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताला पदक तालिकेमध्ये चौथे स्थान मिळवणे शक्य झाले. गुणवत्तेचा आणि कौशल्यांचा विचार केला तर भारतीय खेळाडूंनी कमालीची प्रगती केली आहे. त्यामुळे साहजिकच खेळाडूंचा आत्मविश्वासही वाढलेला दिसला. याच आत्मविश्वासासह हे खेळाडू आता ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत उतरतील.