क्रीडा संचालनालयाकडे फेब्रुवारीमध्ये फाईल पाठवूनही महाराष्ट्रातील राष्ट्रीय खेळाडूंना या वर्षी हक्काच्या २५ वाढीव गुणांपासून वंचित रहावे लागणार आहे. पुण्याच्या राज्य क्रीडा संचालनालयाच्या कार्यपद्धतीचा फटका नापास खेळाडूंना बसणार आहे. बोनस गुणांच्या चांगल्या पद्धतीला बोगस खेळाडू व खेळांमुळे चच्रेविना बासनात गुंडाळण्यात आले. मात्र गेल्या दोन वर्षांपासून चालत आलेल्या वाढीव गुणांवरही या वर्षी बोळा फिरवण्यात आल्याने क्रीडाजगतात नराश्य पसरले आहे.
सर्व खेळाडूंनी विहीत वेळेत आपापले अर्ज सुपूर्द केल्यावर क्रीडा संचालनालयाने ते सर्व अर्ज बाजूला ठेवले. विविध क्रीडा संघटनांनी अर्जाबाबत सातत्याने पाठपुरावा केला असता त्यांना नव्या मागणीला सामोरे जावे लागले. कार्यकारिणी समिती बदलल्याचा अहवाल धर्मादाय आयुक्तांकडे सादर केल्याचा पुरावा क्रीडा संघटनांकडून मागण्यात आला. त्यावर कळस म्हणजे, हा बदलण्यात आलेला अहवाल धर्मादाय आयुक्तांच्या दफ्तरीसुद्धा बदलण्यात आल्याचा पुरावा क्रीडा संघटनांकडून मागण्यात आला. याबाबत काही क्रीडा संघटनांनी आपापल्यापरीने प्रयत्न केले. पण खेळाडूंच्या वाढीव गुणांसाठी धर्मादाय आयुक्तांकडून झटपट कामे करून घेणे सर्व क्रीडा संघटनांना जमले नाही.
विद्यार्थ्यांना २५ वाढीव गुणांचा लाभ मिळण्यासाठी हिरवा कंदील दाखवत काही क्रीडा संघटनांनी कार्यकारिणी बदलल्याचा अहवाल ई-मेलद्वारे जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांकडे पाठवला. काही खेळाडूंनी तातडीने आपापल्या जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांचे स्वाक्षरी असणारे प्रपत्र घेऊन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या विविध कार्यालयात धाव घेतली. पण आता वेळ निघून गेली, त्यामुळे वाढीव गुण देता येणार नाहीत, असे सांगून विद्यार्थ्यांची बोळवण करण्यात आली.