भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळला शनिवारी खेळवला गेला. जो रूटच्या १८० धावांच्या नाबाद खेळीमुळे संपूर्ण इंग्लंडचा पहिल्या डावात ३९१ धावांवर खेळ आटोपला आहे. पहिल्या डावाच्या जोरावर इंग्लिश संघाने २७ धावांची आघाडी घेतली. रूटसमोर भारतीय गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले आणि तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात टीम इंडियाला एकही विकेट मिळाली नाही. मात्र, चहापानानंतर इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज यांच्या गोलंदाजीमुळे भारतीय संघाने सामन्यात पुनरागमन केले. मात्र या सामन्याच्या इंग्लंडच्या डावादरम्यान एक धक्कादायक घटना घडली.

भारतीय संघाची जर्सी घातलेला एक क्रिकेट चाहता मैदानात शिरला होता आणि संघाचा एक भाग असल्याचे तो कर्मचाऱ्यांना सांगत होता. त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे अनेकांना हसू आवरत नाहीये तर दुसरीकडे दुसरीकडे भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक असल्याचे म्हटले आहे.

भारतीय संघ लंच ब्रेकनंतर मैदानावर परतत असताना ही घटना घडली. यादरम्यान, हा चाहता भारतीय संघाची जर्सी घालून मैदानावर आला. त्याच्या जर्सीच्या पाठीवर ‘जार्वो’ लिहिलेले होते. जेव्हा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला मैदानातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने त्याच्या जर्सीवरील बीसीसीआयच्या लोगोकडे बोट दाखवले. बऱ्याच प्रयत्नानंतर या चाहत्याला बाहेर काढण्यात आले.

दरम्यान, समालोचक आकाश चोप्रा यांनी हे चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. या घटनेचा व्हिडिओ शेअर करत आकाश चोप्रा यांनी, ‘खूप चिंताजनक. कोविडचा काळ पाहता अधिक विचार करण्याची गरज आहे. हे कसे होऊ दिले? ‘, असे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.