दुलीप ट्रॉफी करंडकाच्या फायनलच्या मुकाबल्यात वैभव सूर्यवंशी खेळतोय समजताच चेन्नईकरांनी चेपॉक स्टेडियमवर रविवारी गर्दी केली. वैभवने आक्रमक सुरुवात केली मात्र पहिल्या सत्रातच तो तंबूत परतला. पूर्व संघाचा कर्णधार इशान किशनने चाहत्यांच्या पाठिंब्याला दाद देत शतकी खेळी साकारली.
दुलीप ट्रॉफीच्या आधीच्या सर्व लढती बंगळुरूतल्या सेंटर ऑफ एक्सलन्स केंद्रातील मैदानांवर झाल्या होत्या. मात्र जास्तीजास्त चाहत्यांना लाडक्या खेळाडूंचा खेळ पाहता यावा यासाठी बीसीसीआयने वेळापत्रकात बदल करत फायनलची लढत चेन्नईत आयोजित करायचं ठरवलं. अभ्यासू क्रिकेटप्रेमी अशी ओळख असलेल्या चेन्नईकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत खेळाडूंना पाठिंबा दिला.
पूर्व संघाकडून खेळणारा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी तर दक्षिण विभागातर्फे खेळणारा श्रेयस गोपाळ या दोघांचा हा फर्स्टक्लास क्रिकेटमधला १००वा सामना आहे. यानिमित्ताने विशेष जर्सी आणि कॅप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
पूर्व विभागाचा कर्णधार इशान किशनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. ३१वर्षीय अभिमन्यू इश्वरन आणि १५वर्षीय वैभव सूर्यवंशी यांनी पूर्व विभागाला १०० धावांची खणखणीत सलामी दिली. सुरुवातीच्या षटकांमध्ये खेळपट्टीचा अंदाज घेऊन या दोघांनी चौकारांवर भर दिला. मोहम्मद सिराजसारखा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारा गोलंदाज असूनही वैभवने नेहमीच्या खाक्याने फटकेबाजी केली. अर्धशतकाकडे वाटचाल करणाऱ्या वैभवची खेळी चामा मिलिंदने संपुष्टात आणली. उसळत्या चेंडूवर पूल करण्याचा वैभवचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन विसावला. त्याने ५ चौकार आणि एका षटकारासह ४४ धावांची खेळी केली.
अभिमन्यू चांगल्या लयीत खेळत होता. त्याला शिखर मोहन चांगली साथ देत होता. मात्र चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात अभिमन्यू धावबाद झाला. त्याने १० चौकार आणि एका षटकारासह ७२ धावांची खेळी केली. सेमी फायनलच्या लढतीत मोठी खेळी करणारा सुदीप कुमार घरामी ६ धावा करुन तंबूत परतला. सुदीप बाद झाल्यानंतर कर्णधार इशान किशन मैदानात आला. त्याने शिखरच्या साथीने चौथ्या विकेटसाठी ९४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. शतकाकडे वाटचाल करणाऱ्या शिखरला मिलिंदनेच बाद केलं. त्याने ९ चौकार आणि ३ षटकारांसह ८५ धावांची खेळी केली.
शिखरच्या जागी खेळायला उतरलेल्या कुमार कुशाग्रने इशानला चांगली साथ दिली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १४४ धावांची भागीदारी रचली. श्रेयस गोपाळच्या चौकार लगावत इशानने फर्स्ट क्लास क्रिकेटमधलं दहावं शतक झळकावलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पूर्व विभागाने ३८५/४ अशी मजल मारली आहे. इशान १११ तर कुशाग्र ६३ धावांवर खेळत आहेत.
दक्षिण विभागाचे डावपेच बचावात्मक होते. अगदी पहिल्या तासापासून लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ, डीप मिडविकेट असं क्षेत्ररक्षण लावण्यात आलं होतं. वैभवने फटकेबाजी करू नये यासाठी हे होतं पण प्रत्यक्षात वैभव-अभिमन्यू यांनी सहजपणे धावांची लयलूट केली. दक्षिण विभागाकडे फिरकीपटू असूनही दिवसभरात त्यांना ७९ षटकंच टाकता आली.
