चौथ्या कसोटीसाठी प्रसिद्ध कृष्णाचा समावेश; शार्दूल ठाकूर, उमेश यादवचं काय?

चौथ्या सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल करण्यात आले आहेत. चौथ्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याला संघात स्थान देण्यात आलं आहे.

Prasidh-Krishna
चौथ्या कसोटीसाठी प्रसिद्ध कृष्णाचा समावेश (Photo- BCCI)

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथा सामना उद्यापासून द ओवल मैदानात खेळाला जाणार आहे. तिसरा कसोटी सामना जिंकत इंग्लंडने मालिकेत १-१ ने बरोबरी केली आहे. तिसरा कसोटी सामना भारताने एक डाव आणि ७६ धावांनी गमवल्यानंतर चौथ्या सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल करण्यात आले आहेत. चौथ्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याला संघात स्थान देण्यात आलं आहे. प्रसिद्ध राखीव खेळाडूच्या सूचित होता. मात्र दौऱ्याच्या सुरुवातीपासून भारतीय संघासोबत सराव करत आहे. वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव संघात असताना प्रसिद्धला घेतल्याने अंतिम अकरा खेळाडूत त्याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी बुधवारी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने संघ व्यवस्थापनाच्या विनंतीनुसार चौथ्या कसोटीसाठी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचा भारताच्या संघात समावेश केला आहे.

प्रसिद्ध कृष्णा दोन्ही स्विंग करण्यात पटाईत आहे. प्रसिद्ध आतापर्यंत तीन एकदिवसीय सामने खेळला असून सहा गडी बाद केले आहेत. यावर्षी इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्याने चार गडी बाद केले होते. इशांत शर्माच्या जागेवर त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन बदल केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इशांत शर्माच्या जागेवर प्रसिद्ध कृष्णा, रविंद्र जडेजाच्या जागेवर आर. अश्विन आणि अजिंक्य रहाणेच्या जागेवर सूर्यकुमार यादव किंवा हनुमा विहारीला संधी मिळण्याची शक्यता आहे.

भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, वृद्धिमान साहा, अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णा

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Fast bowler prasidh krishna in india squad for 4th test against england rmt

ताज्या बातम्या